वृत्तसंस्था/ ब्युनॉस एअर्स
लायोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर विजेत्या अर्जेन्टिना संघाचे मंगळवारी पहाटे कतारहून येथे आगमन झाले, त्यावेळी हजारो चाहत्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी अर्जेन्टिनाच्या या राजधानी शहरात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
एझीझा विमानतळानजीक असणाऱया अर्जेन्टाईन फुटबॉल संघटनेच्या संकुलात विश्रांती घेतल्यानंतर दुपारी त्यांची खुल्या बसमधून शहरात मिरवणूक काढण्यात आली. सार्वजनिक सुटी असल्याने त्यांना पाहण्यासाठी हजारो लोकांनी रस्त्यावर प्रचंडी गर्दी केली होती. ब्युनॉस एअर्समध्ये आगमन झाल्यानंतर कर्णधार मेस्सी सर्वप्रथम विमानातून बाहेर आला त्यावेळी प्रशिक्षक स्कोलानीही त्याच्यासोबत होते. त्याने विश्वचषक उंचावून दाखवत सर्वांना अभिवादन केले. त्यानंतर आघाडीवीर ज्युलियन अल्वारेझ बाहेर आला. अल्वारेझने अनपेक्षित कामगिरी करीत स्पर्धेत चार गोल नोंदवले. विमानाच्या मागील बाजूस मेस्सीचे मोठे पोस्टर लावण्यात आले होते आणि ‘एक संघ, एक देश, एक स्वप्न’ असे शब्द त्यावर लिहिण्यात आले होते. सर्व खेळाडू विमानातून उतरल्यावर रेड कार्पेटवरून थेट खुल्या बसमध्ये गेले. स्का बँड ला मोस्का बँडपथकासह मिरवणूक निघाली. फायनल जिंकल्यानंतर रविवारी अर्जेन्टिनात सुरू झालेल्या पार्टीपासून उत्साह निर्माण झाला होता.

‘विमानतळावर मी त्यांचे जोरदार स्वागत करणार आहे. त्यांनी आता वर्ल्ड कप जिंकला असल्याने त्यांचे स्वागत करून त्यांचे आभार मानायला हवेत,’ असे जोस लुईस क्विनोगा हा 56 वर्षीय चाहता म्हणाला. या शहरातील ओबेलिस्क मेमोरियल येथे चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली हाती. रविवारी या ठिकाणी प्रचंड जल्लोष करण्यात आला होता. विमानतळावर खेळाडूंसाठी खासगी व्हीआयपी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. मेस्सीने शानदार कारकिर्दीत वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम करीत माजी आयडॉल दिएगो माराडोनाचे अनुकरण केले. 1986 मध्ये माराडोनाने अर्जेन्टिनाला वर्ल्ड जिंकून दिला होता. ‘मात्र यावेळचा विजय खूप भावनिक व तणावपूर्ण होता,’ असे 65 वर्षीय आर्किटेक्ट रिकार्दो गुनफेल्ड म्हणाले.
अंतिम लढतीच्या नियमित वेळेत अर्जेन्टिनाने पूर्वार्धात 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण नंतर एम्बापेने दोन गोल नोंदवून फ्रान्सला बरोबरी साधून दिली. जादा वेळेतही मेस्सीने गोल केल्यानंतर एम्बापेने दुसऱया सत्रात गोल नोंदवून 3-3 अशी बरोबरी साधल्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. त्यात गोन्झालो माँटियलने नोंदवलेला स्पॉट किकचा गोल निर्णायक ठरला.
तिकडे पॅरिसमध्येही उपविजेत्या फ्रान्सच्या खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सोमवारी सकाळी त्यांचे चार्लस डी गॉल एअरपोर्टवर आगमन झाले होते. गोलरक्षक व कर्णधार हय़ुगो लॉरिसने चाहत्यांनी पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कतारमधील स्पर्धेला एकूण 3.4 दशलक्ष प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शविली तर दहा लाखाहून अधिक प्रवाशांनी कतारला सामने पाहण्यासाठी भेट दिल्याचे फिफाने सांगितले.