बाबुराव धुरी यांची गटशिक्षणाधिकाऱयांना सूचना : ग्रामीण रुग्णालयाला 13 सलाईन स्टॅण्ड भेट : दोडामार्ग पं.स. बैठक
वार्ताहर / दोडामार्ग:
राज्यभरात गेल्या 15 जूनपासून ऑनलाईन शिक्षणास सुरू झाली आहे. आपल्या तालुक्यातही एकूण 94 जि. प. शाळा असून सर्व शाळांचा व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर करू नये, अशी सूचना गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांना पं. स. सदस्य बाबुराव धुरी यांनी दिली आहे.
दोडामार्ग पंचायत समिती मासिक सभा गुरुवारी सभापती संजना कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती सुनंदा धर्णे, धनश्री गवस, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.
धुरी यांनी पुढे सांगितले की, तालुक्यातील काही शाळांमध्ये अजूनही वॉश बेसिनची सुविधा उपलब्ध नाही. अशा शाळांची यादी तयार करून वॉश बेसिनची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी. दरम्यान, कोरोना कालावधीत ज्यांचे आई-वडील मृत्युमुखी पडले आहेत, त्या गावातील ग्रामपंचायतींनी संबंधितांचे प्रस्ताव करून पाठवावे, अशा सूचना सभापती संजना कोरगावकर यांनी केल्या. यावेळी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला 13 सलाईन स्टॅण्ड पं. स. दोडामार्गतर्फे भेट देण्यात आले.