हजारो पालक-विद्यार्थी आश्वस्त; पीएमओ, आरोग्य मंत्रालयाचा उचित निर्णय
रजनीश जोशी/सोलापूर
येत्या मंगळवारी (दि. ३० जून) रोजी पुण्यासह देशभरात होणाऱ्या ‘बायोटेक्नॉलॉजी इलिजिबिलिटी टेस्ट’ (बेट) आणि ‘ग्रॅज्युएट अॅपटिट्युड टेस्ट- बायोटेक्नॉलॉजी’ (गॅट-बी) परीक्षा कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर काही काळ स्थगित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी व पालकांनी त्यासंबंधी आरोग्य मंत्रालयासह ‘पीएमओ’ला ट्विटद्वारे अडचणी सांगितल्या होत्या. त्याची तातडीने दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
भारतभरातून ‘बेट’ आणि ‘गॅट-बी’ परीक्षेसाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. सोलापूरसह अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुणे केंद्र मिळाले होते. ३० जून रोजी सकाळी साडेसात वाजता या केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आल्या होत्या. कोविड१९ मुळे सध्या प्रवासाची परवानगी घेण्यापासून मुक्कामापर्यंत अनेक अडचणी आहेत. पुणे आणि सोलापूर ही दोन्ही शहरे रेडझोनमध्ये आहेत. याबाबत सोलापुरातील विद्यार्थिनी नुपूर दिलीप कुलकर्णीसह अमेय वाघ आणि इतरांनी पीएमओ तसेच आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना ट्विट केले. त्यांना भाजप नेते शाम जाजू, वृषाल येळेगावकर, गणेश रामदासी प्रभृतींनी मार्गदर्शन केले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार सुभाष देशमुख यांनीही यात लक्ष घातले. परिणामी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रावर पोचणे अशक्य होते – नूपूर
सोलापूरहून पुण्यात पोचून सकाळी साडेसात वाजता परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे तांत्रिकदृष्ट्या कठीण होते. परीक्षा पुढे ढकलल्याने आमची सोय झाली आहे. आरोग्य मंत्रालयाचे आम्ही आभारी आहोत. – नुपूर कुलकर्णी, परीक्षार्थी ‘बेट’, सोलापूर
मंत्रालयाने तत्काळ दखल घेतल्याने फायदा
पुण्यात मुक्कामासाठी लॉज किंवा नातेवाईकही ठेवून घेणे शक्य नव्हते. अशा स्थितीत परीक्षा देणे त्यांना अवघड होते. आरोग्य व विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने तत्काळ दखल घेतल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टळले. – वृषाल येळेगावकर, विद्यार्थी सहाय्यक
संवेदनशील व लोकाभिमुख निर्णय
डॉ. हर्षवर्धन यांनी विद्यार्थ्यांची अडचण ध्यानात घेऊन एका रात्रीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याचे सचिव सदानंद आणि अन्य अधिकाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेतल्याने हा संवेदनशील आणि लोकाभिमुख निर्णय घेतला गेला. – गणेश रामदासी, फिल्ड पब्लिसिटी ऑफिसर
Previous Articleसोलापूर : अक्कलकोटमध्ये आढळले सहा कोरोना बाधित रुग्ण
Next Article राज ठाकरे यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव
Related Posts
Add A Comment