जि. पं. सीईओंचे लीड बँकेला पत्र : बँकांनी आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
झिरो बॅलन्स खाते उघडण्याच्या सूचना असतानाही बँका मात्र हजार ते पंधराशे रुपये घेऊन विद्यार्थ्यांची खाती उघडत आहेत. यामुळे दोनशे-तीनशे रुपयांसाठी हजार रुपये भरून खाते उघडावे लागत असल्याने पालकांना आर्थिक फटका बसत होता. पालकांच्या या समस्येची दखल घेऊन जिल्हा पंचायत सीईओंनी लीड बँकेला पत्र लिहून सर्व बँका व पोस्ट कार्यालयांनी विद्यार्थ्यांचे झिरो बॅलन्स खाते उघडण्याचे आदेश दिले
आहेत.
कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार मिळाला नाही. या काळातील मध्यान्ह आहाराचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आहारानुसार पैसे खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. परंतु अनेक विद्यार्थ्यांचे खाते नसल्याने त्यांना नवीन खाते उघडावे लागत आहे. शहरासह ग्रामीण भागात नवीन खाते उघडणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे. खाते काढण्यासाठी 1 हजार ते 1 हजार 500 रुपये रक्कम खात्यात ठेवावी लागत आहे. तसेच कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
सरकारच्या आदेशानुसार झिरो बॅलन्स खाते बॅकांनी उघडणे आवश्यक होते. परंतु बँकेमध्ये जाताच हजार ते पंधराशे रुपये भरून खाते उघडावे लागत आहे. आधीच कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून व्यवयास थंडावले, काहींच्या नोकऱया गेल्या आहेत. यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट असताना त्यातच खाते काढण्यासाठी पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न पालकांसमोर आहे. पैसे नसल्याने अनेकांनी खाते उघडणेही टाळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बॅंकांच्या या कारभाराविरोधात संताप व्यक्त होत होता.
पालकांच्या या समस्येची दखल घेऊन जिल्हा पंचायतीच्या सीईओंनी लीड बँकेच्या अधिकाऱयांना पत्र पाठवून कानउघाडणी केली आहे. सर्व राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका तसेच पोस्ट कार्यालयात झिरो बॅलन्स खाते उघडण्याचा आदेश केंद्र सरकारचा असून याची बँकांनी अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी पत्रातून केल्या आहेत. त्यामुळे आता तरी बँका या आदेशाचे पालन करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तरुण भारतच्या बातमीचा दणका

‘दीडशे-दोनशे रुपयांसाठी हजाराचा खर्च’ या मथळय़ाखाली तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध करून पालकांच्या व्यथा मांडल्या होत्या. तरुण भारतने दणका देताच जिल्हा पंचायत सीईओंनी याची दखल घेऊन बँकांनी झिरो बॅलन्स खाते उघडावे, अशा सूचना केल्या आहेत. यामुळे पालकांचा काही प्रमाणात का होईना आर्थिक भार हलका होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.