29 जून रोजी मतदान : निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यसभा निवडणूक पार पडल्यानंतर दहा दिवसांनी म्हणजेच 29 जून रोजी कर्नाटक विधानपरिषदेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विधानसभेतील सदस्यबळानुसार 7 पैकी चार जागा भाजपला, दोन जागा काँग्रेसला आणि एक जागा निजदला मिळण्याची शक्यता आहे.
विधानपरिषद सदस्य नसीर अहमद, एम. सी. वेणूगोपाल, एच. एम. रेवण्णा, जयम्मा, एन. एस. बोसराज (काँग्रेस), टी. ए. शरवण (निजद), डी. यु. मल्लिकार्जुन (अपक्ष) यांचा अधिकार अवधी जून अखेरीस संपणार आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.
राज्य विधानसभेवरून होणाऱया विधानपरिषदेच्या 7 जागांसाठी 29 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार आहे. सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होईल. राज्यसभा निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी मिळेल, याबाबतची उत्सुकता आता संपली असून विधानपरिषदेसाठी कोणाकोणाला तिकिटे मिळणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
चार जागांसाठी भाजपमध्ये मोठी यादी
भाजपला विधानसभेतील सदस्यसंख्येनुसार 4 जागा मिळण्याची खात्री आहे. या पक्षात निवडणूक लढविण्यासाठी आर. शंकर, एम. टी. बी. नागराज, एच. विश्वनाथ, सी. पी. योगेश्वर, ए. एच. आनंद, निर्मलकुमार सुराना, मालिकय्या गुत्तेदार, भारती शेट्टी यांची नावे चर्चेत आहेत. राज्यात भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी पक्षांतर केलेल्या आर. शंकर, एम. टी. बी. नागराज, एच. विश्वनाथ यांना तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे. तसेच ‘ऑपरेशन कमळ’ यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सी. पी. योगेश्वर यांना देखील अधिक संधी आहे.
काँग्रेससमोर उमेदवार निवडीची कसोटी
काँग्रेसमध्ये यावेळी देखील अधिक जण उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. एच. एम. रेवण्णा, एम. रामचंद्रप्पा, नसीर अहमद, एम. डी. लक्ष्मीनारायण, आयवान डिसोझा, व्ही. एस. उग्रप्पा, जयमाला, भारती शंकर यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यांच्यापैकी दोघांना उमेदवारी देण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यामुळे उमेदवार निवडीची खरी कसोटी याच पक्षात दिसून येणार आहे.
निजदमध्ये शरवण यांना पुन्हा संधी?
राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याकरिता निजदला काँग्रेसने सहकार्य केले आहे. याच्या मोबदल्यात निजदच्या वाटय़ाला येणारी एक जागा आपल्यासाठी सोडून देण्याची अट काँग्रेसकडून घालण्यात येण्याची शक्यता आहे. जर एक जागा निजदसाठी मिळाल्यास विद्यमान विधानपरिषद सदस्य टी. ए. शरवण यांची पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे. एन. एच. कोनरेड्डी व कुपेंद्र रेड्डी हे देखील उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.