प्रतिनिधी / बेंगळूर
विधानपरिषदेच्या 15 डिसेंबर रोजी झालेल्या एक दिवसिय अधिवेशनात प्रचंड गदारोळ माजला होता. सभापतींच्या आसनावर विराजमान असलेल्या उपसभापतींना खुर्चीवरुन खाली खेचून धक्काबुक्की करण्यात आली होती. या घटनेप्रकरणी विधानपरिषदेचे सदस्य मरितिब्बेगौडा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 84 पानांचा अंतरिम अहवाल सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांच्याकडे सादर केला आहे.
विधानपरिषदेतील घटनेप्रकरणी अहवाल सादर केल्यानंतर बोलताना मरितिब्बेगौडा म्हणाले, अहवाल सादर करण्यासाठी आपल्या समितीला 20 दिवसांची मुदत देण्यात आली आहेत. आतापर्यंत आपल्या समितीने पाच बैठका घेतल्या आहेत. तपास करण्यासाठी आणखी कालावधी आवश्यक असल्याने पहिल्या चार बैठकींमध्ये जमा करण्यात आलेली माहिती आणि पुरावे सीडीच्या स्वरुपात विधानपरिषद सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांच्याकडे सादर केला आहे. संपूर्ण अहवाल सादर करण्यासाठी आणखी मुदतवाढ मागण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
अधिवेशन कामकाजाचे चित्रिकरण केलेल्या खासगी वृत्तवाहिन्या, विधानपरिषदेचे वेबकास्ट, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि वार्ता-जनसंपर्क खात्याकडून घटनेविषयी माहिती मिळविणे आवश्यक असल्याचा निर्णय आपल्या समितीने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
विधानपरिषदेतील गदारोळानंतर काही दिवसांनी उपसभापती एस. एल. धर्मेगौडा यांनी आत्महत्या केली होती. तत्पूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी तपासासाठी देण्याची विनंती गृहखात्याच्या सचिवांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे 20 दिवसांत तपास करून संपूर्ण अहवाल सादर करणे शक्य झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.