विरोधी पक्षांची राज्यपालांकडे मागणीचे निवेदन
प्रतिनिधी / पणजी
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची राजभवन, दोनापावला येथे भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. त्यात पालिका निवडणूक आचारसंहितेमुळे विधानसभा अधिवेशन दोन दिवसांपुरते मर्यादित करावे अशी मागणी केली.
पालिका निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन घ्यावे आणि दोन दिवसात विनियोग विधेयक संमत करावे असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना द्यावेत, विनवणी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना केली.
आचारसंहिता चालू असताना अर्थसंकल्प सादर करणे आणि त्यात नवीन योजनांची घोषणा करणे हे चुकीचे ठरणार आहे. त्यामुळे पालिका निवडणूक निकाल झाल्यानंतर अधिवेशन पुढे न्यावे, अशी सूचना विरोधी पक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली तसेच वरील आशयाचे निवेदनही दिले. त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन कोशियारी यांनी दिले आहे.
कामत यांनी वरील माहिती पत्रकारांना दिली. शिष्टमंडळात गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई, मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर, आमदार प्रसाद गांवकर, जुझे फिलीप डिसोझा यांचा समावेश होता.