सहा महिन्यांवर ठेपलीय निवडणूक : भाजप, काँग्रेस, मगो, गोवा फॉरवर्डकडून चाचपणी भाजपकडून मतदारसंघांसाठी निरीक्षक नियुक्त

प्रतिनिधी / पणजी
गोवा राज्य विधानसभेच्या निवडणुका केवळ 6 महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने राज्यातील सत्ताधारी भाजप तसेच विरोधी पक्ष काँग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड या पक्षांनी काम सुरु केले आहे. भाजपने प्रत्येक मतदारसंघासाठी निरीक्षक नियुक्त केले आहेत. काँग्रेस पक्षाने सर्वेक्षण पूर्ण केले आहे. गोवा फॉरवर्डने शनिवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेऊन निवडणुकीसाठी धोरणात्मक निर्णय घेतले. मगो पक्षाने 18 जागांवर निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरु केली असून उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.
विधानसभेची मुदत 16 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत असून तत्पूर्वी म्हणजे जानेवारी 2022 मध्ये निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजपने सुमारे 35 विधानसभा मतदारसंघासाठी तयारी सुरु केली आहे. त्याचबरोबर 40 ही मतदारसंघांसाठी पक्षाने निरीक्षक नियुक्त केले आहेत.
भाजप प्रसंगी युतीच्या तयारीत?
मगो पक्षाने 18 जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी तयारी सुरु केल्याने विरोधी पक्ष एकत्र येतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्ष 40 ही मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी तयारीत आहे, असे निवेदन केले आहे. गोवा फॉरवर्डने मात्र आमची काँग्रेस पक्षाबरोबर बोलणी सुरु आहे. आम्ही सध्यातरी 10 जागांसाठीची तयारी चालू केल्याचे नमूद केले. सत्ताधारी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आमचा पक्ष प्रसंगी युती करण्याचाही विचार करील, असे निवेदन केल्याने पक्ष मगोकडे युती करण्याच्या विचारात आहे की काय? याबाबत संशय बळावलेला आहे.
लवकरच पक्ष करणार सर्वेक्षण निवडणुकीत आता केव्हाही सज्ज : तानावडे
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, पक्षाने निवडणुकीसाठीची जवळपास सर्व तयारी अलिकडेच पूर्ण केली. आता आम्ही प्रत्येक मतदारसंघासाठी एक निरीक्षक नियुक्त केला आहे. पक्षाच्या केंद्रीय नेत्यांबरोबरही आमची बोलणी सुरु आहेत. लवकरच पक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु करील. आम्ही 35 मतदारसंघात निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहोत. बाणावलीसारख्या मतदारसंघात आमचे मतदार कमी आहेत त्यामुळे अशाच काही मतदारसंघातून पक्ष निवडणूक प्रत्यक्षात लढविणार नाही. भाजपने कोणत्याही पक्षाकडे युती करणार नाही असे कधी म्हटलेले नाही. गरज पडली तर युतीसाठी प्रयत्नही केले जातील. असे सांगून तानावडे यांनी पक्ष पुन्हा सत्तेवर येईल मात्र निवडणुकीमध्ये सर्व विद्यमानाना उमेदवारी मिळेलच असे कोणी गृहित धरु नये. आमच्या हातात काही नसते. पक्षश्रेष्ठी जे ठरवितात त्यानुसार उमेदवारी ठरतील. एका घरात दोघांना उमेदवारी मिळणार नाही. केवळ मोन्सेरात हेच अपवाद असतील. कारण दोन्ही पती, पत्नी आमदार हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत. घराणेशाहीला भाजप स्थान देणार नाही. त्याचबरोबर काही नवे चेहरे देखील यावेळच्या निवडणुकीत पक्षाला मिळतील, असे तानावडे म्हणाले.
18 मतदारसंघांत मगोची तयारी सुरु लवकरच पक्षाची बैठक : सुदिन
मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की आपल्या पक्षाने निवडणुकीसाठी निश्चित असे धोरण तयार करण्याचे ठरविले आहे व पक्षाच्या कार्यकारिणीची लवकरच बैठक होईल. तीत निवडणुकीबाबत काय करायचे हे ठरविले जाईल. सध्यातरी पक्षाने 18 मतदारसंघात उमेदवार उभे करण्यासाठी तयारी चालविली आहे व 18 ही मतदारसंघामध्ये काम सुरु केल्याचे सांगितले. नियोजित उमेदवार निवड प्रक्रियाही सुरु केली जाईल. पक्षाकडे 18 मतदारसंघात उमेदवार आहेत. पक्ष त्या दृष्टिकोनातून वाटचाल करील, मात्र कोणत्याही भ्रष्टाचारी पक्षाबरोबर मगो पक्ष युती करणार नाही, असे सुदिन ढवळीकर म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत व निवडणुकीनंतरही मगो पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
40 ही मतदारसंघातून लढविण्याचा काँग्रेसचा इरादा निवडणुकीची तयारी सुरु : गिरीश
सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सध्या प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेऊन तयारी सुरु केली आहे. शिवाय प्रत्येक मतदारसंघात सर्वेक्षणाचे काम काँग्रेस पक्षाने पूर्ण केलेले आहे. आम्ही कोणत्याही पक्षाकडे आघाडी करण्याचा विचार करणार नाही. आता पक्षश्रेष्ठी काय सांगतील त्यानुसार काँग्रेस पक्ष आपले धोरण ठरविणार आहे. सध्या 40 ही मतदारसंघात पक्षाच्या गट समित्यांतर्फे काम सुरु आहे आणि आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष महत्त्वाची कामगिरी बजावणार, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले.
होय! भाजपला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना आम्ही एकत्र आणतोय : विजय सरदेसाई
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डने आगामी निवडणुकीसाठीची तयारी सर्वत्र सुरु केलीय. आम्ही 10 जागांवर उमेदवार शोधण्याचे काम सुरु केलेले आहे. त्या संदर्भात काही संभाव्य उमेदवारांना बरोबर घेऊन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आपण शनिवारीच घेतली. आपण निवडणूक आयोगाकडूनही चौकशी केलेली आहे. निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील आणि आपण स्वतः निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्रही लिहिलेले आहे. आमचे धोरण नक्की आहे. आम्ही गोमंतकीय जनतेच्या हिताचा विचार करुनच निर्णय घेणार आहोत. भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणणार आहोत. पक्षाने 10 जागांवर निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरु ठेवलीय आणि निवडून आलेला विरोधी पक्षाचा एकही आमदार यानंतर फुटणार नाही असे धोरणच तयार केलेले आहे, असे विजय सरदेसाई म्हणाले.