गुरुवारी दुपारपर्यंत 1150 रुपये दंड वसूल
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा प्रसार वाढल्याने मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या ओमिक्रॉन विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमी असली तरी फैलाव वाढत आहे. कोरोनाची धास्ती कमी झाल्याने नागरिक विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र महानगरपालिकेने विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. गुरुवारी शहापूर भागातही कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव झपाटय़ाने होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याने सामाजिक अंतर राखणे आणि तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरात काही नागरिक विनामास्क फिरत असल्याने जागृती मोहीम तसेच दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. मात्र दंडाची रक्कम अडीचशे रुपये करण्यात आल्याने नागरिक रक्कम भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत 1150 रुपये दंड वसूल करण्यात आला.
महापालिकेने विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्याची मोहीम सोमवारपासून हाती घेतली आहे. शहापूर विभागात विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्यात येत आहे. यावेळी स्वच्छता निरीक्षक शिल्पा कुंभार, सुभाष गिरानी, किरण देमट्टी, संजय पाटील, नितीन देमट्टी, ओबळेश बेंगळुरे आदींसह मनपाचे कर्मचारी मोहिमेत सहभागी होते.