टिळकवाडी सोमवार पेठेतील प्रकार : स्मार्ट सिटी कंपनीकडून दुर्लक्ष, नळ-डेनेज वाहिन्या जोडण्याची आवश्यकता
प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी सोमवार पेठ परिसरातील रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यावर पेव्हर्स घालण्यात येणार आहेत. पण हे काम करण्यापूर्वी नळजोडण्या, डेनेज जोडण्या आणि विद्युत वाहिन्या घालण्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र ही कामे करण्यापूर्वीच रस्ता करण्यात येत आहे. विविध जोडण्याचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याचा विकास करण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. सध्या रस्ता सपाटीकरणाचे काम करण्यात येत आहे. हे काम पूर्ण केल्यानंतर पेव्हर्स घालून रस्ता करण्यात येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी नागरिकांना दिली आहे. वास्तविक, रस्त्याच्या विकासाकरिता लाखोचा निधी खर्च करण्यात येत असल्याने गरजू नागरिकांना डेनेज वाहिन्या, विद्युत वाहिन्यांची जोडणी आणि नळ जोडणी करून देणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतर विविध जोडण्या करून देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण करण्यापूर्वी जोडण्या करून देण्याची गरज असताना स्मार्ट सिटी कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे.
कामे पूर्ण झाल्यानंतरच रस्ता करा
या परिसरातील रहिवाशांना नळ जोडण्या व डेनेज वाहिन्यांची आवश्यकता आहे. पण याबाबत कोणतीच सूचना नागरिकांना करण्यात आली नाही. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही जोडणीकरिता अर्ज केल्यास रस्ता खोदण्याची परवानगी मिळत नाही. परिणामी नागरिकांना नळ जोडणी अथवा डेनेज जोडणीपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे सोमवार पेठेतील रस्त्याचे काम करण्यापूर्वी नळ जोडणी, डेनेज आणि विद्युत जोडणी करण्याची सूचना करावी तसेच ही कामे पूर्ण झाल्यानंतरच रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.