अमेरिकेतील वैज्ञानिकांना महत्त्वाचे यश : एब्सेलेन औषध वापरासाठी सुरक्षित
संक्रमणानंतर शरीरात कोरोना विषाणूंची संख्या वाढण्यापासून (रेप्लिकेट) रोखणाऱया औषधाचा शोध अमेरिकेच्या संशोधकांनी लावला आहे. या औषधाचा आता कोरोना संसर्गावरील उपचाराकरता वापर केला जाणार आहे. एब्सेलेन या औषधाचा वापर बायपोलर डिसऑर्डर आणि श्रवणशक्ती संबंधित समस्येच्या (हियरिंग डिसऑर्डर) उपचाराकरता केला जातो. अमेरिकेत विविध औषधांवर संशोधन सुरू असून त्याला चांगले यश देखील मिळत आहे. याचनुसार उपचारपद्धत अधिक विकसित होत चालली आहे.
अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाने या औषधावर नव्याने संशोधन केले आहे. औषधाने शरीरातील कोरोनची संख्या वाढविणाऱया एंजाइम्सवर नियंत्रण मिळविण्यात येणार असल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे.
गंभीर स्थिती टळणार

सायन्स ऍडव्हान्सेस जर्नलमध्ये प्रकाशित संशोधन अहवालानुसार एम-प्रो नावाचे एंजाइम कोरोना विषाणूची संख्या वाढण्यापासून रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हाच आरएनए कोरोनाचा स्पाइक प्रोटीन तयार करतो. एम-प्रो एंजाइमच्या मदतीने कोरोना शरीरातील स्वतःची संख्या वाढवितो आणि यातूनच रुग्णाची प्रकृती नाजुक होते. परंतु वैज्ञानिक आता याच एंजाइमला नियंत्रित करून उपचार करणार आहेत.
प्रभावी अस्त्र

कोरोनाचे एंजाइम एम-प्रोच्या विरोधात अस्त्राप्रमाणे हे औषध काम करणार आहे. एम-प्रो वर नियंत्रण मिळविण्यासाठी एब्सेलेन नावाच्या रसायनाचा वापर होणार आहे. यात अँटीव्हायरल, अँटी-इंफ्लेमेट्री आणि अँटी-ऑक्सिडेटिव्ह सारखे गुणधर्म आहेत, अशी माहिती संशोधक जुआन डी-पॅब्लो यांनी दिली आहे. एम-प्रोद्वारे पेशी नष्ट होण्यापासून रोखत येणार आहे. याचा वापर यापूर्वीच बायपोलर आणि हियरिंग लॉस यासारख्या आजारांमध्ये केला जात आहे. या आजारांच्या उपचारात हे औषध अत्यंत उपयुक्त ठरले आहे.
क्लीनिकल ट्रायल
एब्सेलेन माणसांसाठी सुरक्षित असल्याचे क्लीनिकल ट्रायलमध्ये सिद्ध झाले आहे. याचा वापर आता कोरोनावरील उपचारात केला जाणार आहे. बाधिताची प्रकृती गंभीर होण्यास कारणीभूत ठरणाऱया कोरोनाच्या प्रोटीन्सचा शोध संशोधक घेत आहेत. हा शोध लागल्यास नवे धोके ओळखून त्यावरील उपचार हुडकून काढता येणार आहे. तसेच या संशोधकांनी संगणकीय पद्धत वापरून अन्य औषधांवरही संशोधन चालविले आहे.
मेस्कोचा ‘एस्ट्रेजनक़ा’शी करार

कोरोनावरील 20 कोटी लस विकत घेणार
जगभरात कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत 2 कोटी 16 लाख 37 हजार 44 जणांना झाली आहे. यातील 1 कोटी 43 लाख 48 हजार 655 रुग्ण बरे झाले आहेत. मेक्सिकोत लस तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एस्ट्रेजेनका कंपनीशी करार करण्यात आला आहे. महामारीशी लढण्यासाठी सुमारे 20 कोटी लसींची खरेदी केली जाणार असल्याचे मेक्सिको सरकारने सांगितले.
चीनमध्ये 19 नवे बाधित

चीनमध्ये कोरोना संसर्गाचे 19 नवे बाधित आढळले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या आता 84,827 झाली आहे. शिनजियांग उइगूर स्वायत्त क्षेत्रात 4 रुग्ण सापडले आहेत. तर उर्वरित 15 रुग्ण हे विदेशातून आलेले लोक आहेत. दिवसभरात चीनमध्ये एकाचाही महामारीमुळे मृत्यू झालेला नाही. तर दिवसभरात 56 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. सद्यकाळात 618 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
द. आफ्रिका : टाळेबंदी हटली

दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांनी टाळेबंदी हटविण्याची घोषणा केली आहे. देशातील रुग्णसंख्या कमी होत आहे. तंबाखू आणि मद्यावर लादण्यात आलेली बंदी हटविण्यात येईल. रेस्टॉरंट आणि शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची अनुमती दिली जाणार आहे. लोक एका राज्यातून दुसऱया राज्यासाठी प्रवास करू शकणार आहेत, असे अध्यक्ष रामफोसा म्हणाले.
ब्रिटन : हजारहून अधिक नवे रुग्ण

ब्रिटनमध्ये दिवसभरात 1,012 नवे रुग्ण सापडले आहेत. देशात सलग 5 दिवसांपासून 1 हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. ब्रिटनमधील बाधितांचा आकडा 3 लाख 17 हजार 379 झाला आहे. तेथे मागील 28 दिवसांमध्ये 3 बळी गेले आहेत. देशात आतापर्यंत 41,361 जणांचा मृत्यू ओढवला आहे. याचदरम्यान ब्रिटन सरकारने 9 लाख लसींच्या खरेदीची ऑर्डर दिली आहे. ब्रिटनने आतापर्यंत 4 लसनिर्मात्यांशी खरेदीचा करार केला आहे.
फिलिपाईन्स : निर्बंध कठोर

फिलिपाईन्समध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1.5 लाखांच्या पार गेला आहे. देशात एका दिवसभरात 3,420 रुग्ण सापडले आहेत. तर कोरोनाबळींचे प्रमाण 2,665 वर पोहोचले आहे. देशात प्रतिदिन नव्या रुग्णांची संख्या 2 हजारांपेक्षा अधिक राहिली आहे. स्थिती पाहता सरकारने निर्बंध कठोर करत उपाययोजनांना वेग दिला आहे.
ब्राझील : 41,576 रुग्ण

ब्राझीलमध्ये मागील 24 तासांमध्ये 41 हजार 576 नवे रुग्ण सापडले असून 709 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील बाधितांचे प्रमाण 33 लाख 17 हजार 96 झाले आहे. तेथील साओ पाउलो प्रांतात दिवसभरात 11 हजार 408 नवे रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत 1 लाख 7 हजार 232 बळी गेले आहेत.