वृत्तसंस्था/ ला नुसिया (स्पेन)
2022 च्या आयबीए युवा पुरुष आणि महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा विद्यमान आशिया युवा चॅम्पियन विश्वनाथ सुरेश आणि वंशज यांच्यासह अन्य आठ भारतीय स्पर्धकांनी आपल्या विविध वजन गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताच्या विश्वनाथ सुरेशने उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 48 किलो गटात इटलीच्या सॅलव्हेटोरेचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत शेवटच्या आठ स्पर्धकात स्थान मिळविले. चेन्नईच्या विश्वनाथने आपल्या जबरदस्त ठोशावर हा सामना एकतर्फी जिंकला. 63.5 किलो वजन गटात सोनेपतच्या वंशजने स्पेनच्या एनरिकचा 5-0 असा गुणांनी पराभव केला. 51 किलो गटात जादूमनि सिंग, 54 किलो गटात आशिष, 75 किलो गटात दीपक या भारतीय स्पर्धकांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. जादूमनि सिंगने स्पेनच्या ऍसेरचा तर दीपकने फिलिपिन्सच्या पामिसा इजेय यांचा पराभव केला. दीपकने अर्जेंटिनाच्या अँटोनियोवर मात केली.
महिलांच्या विभागात भारताच्या भावना शर्माने 48 किलो वजन गटात पोलंडच्या झुझानाचा तर 50 किलो गटात भारताच्या तमन्नाने फिनलँडच्या जेर्विनेनचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. 54 किलो वजन गटात भारताच्या ग्रिविया देवीने रुमानियाच्या ऍना मारियावर 5-0 अशी मात करत पुढील फेरी गाठली. 67 किलो गटात भारताच्या अमन राठोडला इराकच्या युसूफ हुसेनकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला.