खासगी लक्झरी बसने सोय : आडेली कौल कारखान्याचे कामगार
वार्ताहर / आडेली:
उस्मानाबाद जिल्हय़ातील तुळजापूर-बोरनदीवाडी येथून आडेली येथे मजुरीच्या कामासाठी आलेल्या व लॉकडाऊनमुळे उद्योगच बंद पडल्याने मजुरीविना अडकून पडलेल्या 20 मजुरांची महाराष्ट्र टाईल्स क्ले इंडस्ट्रीजचे संचालक दिगंबर नाईक यांनी कारखाना बंद असतानाही सुमारे दोन महिने सोय केली. त्या सर्वांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी सर्व शासकिय परवानग्या घेत त्यांच्या गावी लक्झरी बसने रवानाही केले. प्रवासांत लागणाऱया सर्व चीजवस्तूही त्यांनी देत स्वखर्चाने सर्वांना रवाना केले. या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांचे प्रयत्न यशस्वी ठरले.
वेंगुर्ले तालुक्यात आडेली येथील महाराष्ट्र टाईल्स क्ले इंडस्ट्रीजमध्ये मंगलोरी कौले बनविण्याच्या कामासाठी डिसेंबरमध्ये येणाऱया नऊ कुटुंबातील 20 मजूर हे गेली 40 वर्षे गणेश चतुर्थीपर्यत मजुरीचे काम करून नंतर गावी जातात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय व उद्योग बंद पडले. यात मंगलोरी कौले बनविणारा आडेली येथील हा उद्योगही बंद पडला. या कामगारांना लॉकडाऊनच्या सुमारे दोन महिन्यात सर्व प्रकारचे अन्नधान्य देत त्यांना काम नसतानाही इंडस्ट्रीजचे मालक दिगंबर नाईक यांनी सावरले.
शासनाने गेल्या दोन दिवसांपासून एका जिल्हय़ातून दुसऱया जिल्हय़ात किंवा एका राज्यातून दुसऱया राज्यात जाण्यासाठी शासनाचे परवाने घेऊन जाण्यास मान्यता दिल्याने दिगंबर नाईक यांनी माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांच्यामार्फत पालकमंत्र्यांची भेट घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व शिवसेना नते संदेश पारकर यांच्या मदतीने व पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर तसेच उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्या सहकार्याने दिगंबर नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, उस्मानाबाद जिल्हाधिकारी तसेच वेंगुर्ले तहसीलदार, वेंगुर्ले तालुका आरोग्य अधिकारी व वेंगुर्ले पोलीस निरीक्षक यांच्याकडे ऑनलाईन पत्रव्यवहार केला. यात त्यांना भांडुप येथील शिवसेना पदाधिकारी अजिंक्य भोसले यांनीही सहकार्य केले.
आडेलीतील मजुरांना त्यांच्या तुळजापूर-बोरनदीवाडी येथे जाण्यासाठी सर्व प्रकारचे तालुका व जिल्हा प्रशासनाचे परवाने असतानाही एस. टी. महामंडळाकडे पैसे भरून बसची मागणी केली असता ती महामंडळाने नाकारली. अखेर या नऊ कुटुंबांतील 20 व्यक्तींसाठी 40 आसनी लक्झरी बस दिगंबर नाईक यांनी बूक करून शुक्रवारी सायंकाळी सर्व नियमांची पूर्तता करून या सर्व मजुरांना तुळजापूरला मार्गस्थ करण्यात आले.
बस मार्गस्थ होताना कौल कारखान्याचे मालक दिगंबर नाईक, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, अजिंक्य भोसले, बांदा येथील विशाल लक्झरी बसचे मालक दिलीप कोरगावकर, सामाजिक कार्यकर्ते कमलेश सामंत आदी उपस्थित होते.