रसिका व समृद्धी यांना कांस्यपदक
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

मंगळूर येथील अल्वाज महाविद्यालय आयोजित कर्नाटक राज्य वेटलिंफ्टिंग संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय युवा, कनिष्ट, वरिष्ट वेटलिफ्टिंग स्पर्धेत बेळगावच्या वैभवी राजू दळवी व श्वेता जाधव यांनी रौप्य तर रसिका बर्डे व समृद्धी शहापूरकर यांनी कांस्य पदक पटकावले.
या स्पर्धेत 64 किलो वजनी गटात वैभवी दळवीने युवा गटाच्या अंतिम फेरीत मजल मारली. पण अंतिम फेरीत तिला मंगळूरच्या खेळाडूने तिला मागे टाकल्याने तिला दुसरे स्थान मिळाले. ती लिंगराज महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. श्वेता जाधवने 49 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारून रौप्य पदक पटकाविले. ती जीएसएस महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. तिने सलग दोन वर्षे युनिव्हर्सिटी ब्ल्यू किताब पटकाविला आहे.
रसिका बर्डेने 81 वजनी वरिष्ट गटात कांस्यपदक पटकाविले असून ती शिवशक्ती नगर अनगोळची रहिवासी आहे तर कणबर्गीची रहिवासी असलेल्या समृद्धी शहापूरकरने 76 किलो वरिष्ट गटात कांस्य पदक मिळविले. या चारही वेटलिफ्टर्सना प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.