प्रतिनिधी / फोंडा
वेलिंग प्रियोळ पंचायतीतर्फे बुधवारपासून पुढील आठ दिवसांसाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनला व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बुधवारी म्हार्दोळ बाजारपेठेसह पंचायत क्षेत्रातील सर्व दुकाने व इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले. प्रियोळ पंचायत क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधीत रुग्णांचे प्रमाण झपाटय़ाने वाढत असून आत्तापर्यंत अडीचशेहून अधिक सक्रीय रुग्ण नोंद झाले आहे, अशी माहिती पंचसदस्य ऍड. वरद म्हार्दोळकर यांनी दिली.
कोरोनाची दुसरी लाट अधिक भीषण असून रुग्ण संख्येबरोबरच मृतांचा आकडाही झपाटय़ाने वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकारने तीन दिवस लागू केलेल्या लॉकडाऊनचा पुरेसा परिणाम जाणून आला नाही. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी किमान पंधरा दिवस लॉकडाऊन अपेक्षित होते. सरकारकडून तशी कुठलीच पावले उचलली जात नसल्याने अखेर वेलिंग प्रियोळ पंचायतीनेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आठ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. नागरिकांकडून त्याला उत्स्फूर्तपणे सहकार्य लाभत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी 7 ते 10 वा. यावेळेत मोजकीच दुकाने खुली राहणार आहेत. दवाखाने, औषधालये, पेट्रोल पंप या अत्यावश्यक सेवा पूर्णवेळ उपलब्ध असतील. एखाद्या दुकानदाराने कारणाशिवाय नियमभंग करून दुकान खुले ठेवल्यास व तशा तक्रारी आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही संकेत वरद म्हार्दोळकर यांनी दिले आहेत. येत्या 12 मे पर्यंत वेलिंग प्रियोळ पंचायत क्षेत्रात हे लॉकडाऊन लागू होणार असून परिस्थिती आटोक्यात न आल्यास त्यात अजून वाढ करण्यासंबंधी पुढे विचार केला जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.