प्रतिनिधी / सांखळी
विठ्ठलपूर सांखळी येथील गावचे पुरोहित वे. प्रभाकरशास्त्री बाक्रे यांचे रविवारी दुपारी अल्प आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.
सांखळी गावचे पुरोहित असलेले प्रभाकरशास्त्री बाक्रे हे समाजसुधारकही होते. त्यांनी अनेक मुस्लिम व ख्रिस्ती धर्मियांना हिंदू धर्मात प्रवेश करुन दिला. अनेक आंतरधर्मिक विवाह करुन त्यांना सुखी संसाराचे मंत्र दिले. त्यांच्यातील समाजसुधारकाचे अनेक अनुभव अनेकांना आले होते. कष्टकरी जीवन जगून अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले. अनेक परधर्मियांचा हिंदू धर्मिय व्यक्तीकडे विवाह करुन देताना त्यांना हिंदू धर्माचे उपदेश दिले आणि दोन्ही धर्मियांना आपसातील कटुता दूर करण्यासाठी त्यांना कानमंत्रही दिले.
पौरहित्य करताना देखील अडल्या नडलेल्यांना ते सतत मदत करीत असत. रविवारी सकाळी देवपूजा केल्यानंतर प्रार्थना करीत असतानाच ते कोसळले. त्यांना सांखळी येथील इस्पितळात दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. आपल्या पश्चात कोणालाही त्रास होऊ नये या करिता त्यांनी आपला व आपल्या पत्नीचा देह दान करण्याचा निर्णय घेऊन तसे प्रतिज्ञापत्रही तयार केले होते. त्यांच्या या इच्छेनुसार दुपारी त्यांचा मृतदेह गोमेकॉ पणजी येथे पाठविण्यात आला. वे. प्रभाकरशास्त्री बाक्रे यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या घरी त्यांच्या अनेक चहत्यांनी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनी, पुत्र श्रीराम, शिवानंद, कन्या प्रतिभा, प्रज्ञा व रत्ना तसेच सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना वृत्त समजताच त्यांनी त्यांच्या घरी जाऊन कै. प्रभाकर बाक्रे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन केले.