महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ महिला पोलीस कोल्हापूरची
सुधाकर काशीद / कोल्हापूर
1948 साली सीआयडीमध्ये भरतीची एक जाहिरात आली. वैजयंती देशपांडे यांनी अर्ज केला आणि त्यांची निवड झाली. सीआयडीची नोकरी म्हणजे खूप जबाबदारी, खूप काम, त्यामुळे तेथे कशाला भरती होता ? अशीच प्रतिक्रिया त्यावेळी व्यक्त झाली. पण वैजयंती मुंबईत रुजू झाल्या. अगदी एखाद्या मध्यमवर्गीय गृहिणीसारख्या त्या साधेपणे लोकांत वावरायच्या आणि त्यांना हवी ती माहीत बरोबर काढायच्या.
कोल्हापूरच्या बाळकृष्ण फडणीस यांच्याशी झालं. त्या कोल्हापूरला आल्या आणि सीआयडीकडे आपली कोल्हापूरला बदली व्हावी, असा अर्ज केला. त्यांची बदली झाली पण कोल्हापूर पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून. त्यावेळी म्हणजे 1960 साली कोल्हापूर पोलीस दलात वैजयंती फडणीस, तारदाळकर, पत्रीजोशी, मांडवकर या फक्त चारच महिला. त्यापैकी या वैजयंती देशपांडे उर्फ फडणीस ह्या एक.
फडणीस यांनी छत्तीस वर्ष पोलिस दलात सेवा दिली. लक्ष्मीपुरी, राजवाडा यासह जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात त्यांनी काम केले. त्यावेळी अख्ख्या जिह्यात फक्त चार महिला पोलीस. त्यामुळे त्यांना जिल्ह्यात जेथे-जेथे महिला पोलिसांची गरज भासायची तेथे तेथे जायला लागायचे. यानिमित्ताने त्यांनी पोलीस दलाचे बरेवाईट अनुभव घेतले. अंबाबाई मंदिरात एखाद्या व्हीआयपी महिलेची भेट म्हणजे तेथे वैजयंती फडणीस यांची ड्युटी ठरुनच गेली होती. त्यांनी एका छाप्याच्या कारवाईत नोटाच्या थप्प्या एका खोलीत रचून ठेवलेल्या पाहिल्या होत्या. पोलिस दलात काम करताना त्यांना माणसाचे विविध पैलू पाहाता आले, वाचता आले. जरूर मान आहे. पण खाकी वर्दी उतरली की, आपण कॉमन मॅनच आहे हे ध्यानात ठेवूनच त्यांनी काम केले.
त्यांचे वय 94 आहे. आर. के. नगर येथे राहतात. एक मुलगा परदेशात, एक मुलगी स्टेट बँकेत, एक शिक्षिका, एक मुलगा मार्केटिंगमध्ये आहे. स्मृती खूप चांगली आहे. पोलिसात जितकी वर्षे नोकरी त्यापेक्षा अधिक वर्षे पेन्शन घेत आहेत. आज महाराष्ट्र पोलिस दिन. कदाचित पोलिस दलातील सर्वात ज्येष्ठ वैजयंती फडणीस आज कोल्हापुरात आहेत. पोलिस दलाच्या वाटचालीचा त्या चालत्या बोलत्या साक्षीदारच आहेत.
2 जानेवारी1961 महाराष्ट्र पोलीस दिन
महाराष्ट्र पोलीस दलाला 2 जानेवारी 1961 रोजी स्वतंत्र ध्वज प्रदान करण्यात आला. तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान सोहळा झाला होता. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून मानला जातो.
36 वर्षे सेवा आणि 40 वर्षे पेन्शन
वैजयंती फडणीस यांची पोलीस दलात 36 वर्षे सेवा झाली आहे आणि त्या 40 वर्षे पेन्शन घेत आहेत. राज्यातील सर्वात ज्येष्ठ महिला पोलीस त्या आहेत.