ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात येण्यापूर्वीच व्यापारासंबंधीची नाराजी व्यक्त केली आहे. भारत आणि अमेरिकेत व्यापारासंबंधी मतभेद असल्यामुळे भारत दौऱयादरम्यान ट्रम्प कोणत्याही व्यापार करारावर सह्या करणार नाहीत. सूत्रांच्या हवाल्याने एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून दोन दिवसीय भारत दौऱयावर आहेत. या दौऱयादरम्यान, भारत आणि अमेरिकेचे संबंध सुधारावेत, व्यापाराला चालना मिळावी, तसेच काही महत्त्वपूर्ण संरक्षणविषयक विषयांवर चर्चा आणि करार होणार होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत येण्यापूर्वीच व्यापाराच्या मुद्दावरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. भारतात मोठय़ा प्रमाणावर कर आकारला जातो, त्यामुळे अमेरिकन कंपन्यांचे नुकसान होते. तसेच व्यापारात भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिली नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे ट्रम्प व्यापारविषयक कोणत्याही करारावर सह्या करणार नसल्याची माहिती मिळत आहे.
मात्र, या दौऱयात विविध संरक्षण करारांवर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच दोन्ही देशांची लोकशाही परंपरा व धार्मिक स्वातंत्र्य यावरही चर्चा होणार आहे. ट्रम्प धार्मिक स्वातंत्र्याबाबतचा मुद्दा मांडणार आहेत.