घरगुती गॅस सिलिंडर दर जैसे थे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
डिसेंबर महिन्यासाठी 19 किलो व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरचा दर वाढला आहे. हा सिलिंडर आता 55 रुपयांनी महाग झाला आहे. तथापि, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजीच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबरनंतर डिसेंबरमध्ये आढावा घेताना किमती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीतील 19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 55 रुपयांनी वाढ झाली असून आता ती 1,296 रुपये करण्यात आली आहे. त्याशिवाय कोलकाता आणि मुंबईत 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 55 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कमर्शियल सिलिंडरची नवीन किमत कोलकाता येथे 1351.50 रुपये आणि मुंबईत 1244 रुपये आहे. चेन्नईमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडर 56 रुपयांनी महाग झाला आहे.
झाल्यामुळे ग्राहकांना प्रतिसिलिंडर 1,410 रुपये मोजावे लागणार आहेत.
जुलैमध्ये 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 4 रुपयांची वाढ झाली होती. त्याचवेळी जूनमध्ये दिल्लीमध्ये 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर 11.50 रुपयांनी महागला होता. तर मे महिन्यामध्ये ते 162.50 रुपयांनी स्वस्त झाले होते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार दिल्लीतील सिलिंडर्सच्या किंमतीत बदल झालेला नाही. दिल्लीत 14.2 किलो अनुदानित गॅस सिलिंडर फक्त 594 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत अनुदानित सिलिंडरची किंमत 594 रुपये असेल. याशिवाय चेन्नईमध्ये 610 रुपये प्रति सिलिंडर किंमत असून कोलकातामध्ये या गॅस सिलिंडरची किंमत फक्त 620 रुपये इतकी आहे.
बाजारपेठेत कांदा, बटाटय़ासह भाज्यांच्या किमती कडाडल्या असताना सरकारी तेल कंपन्यांनी डिसेंबर महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल केले नाहीत. घरगुती सिलिंडरच्या किमती स्थिर असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने हॉटेलमधील ग्राहकांच्या खिशाला कात्री लागू शकते. देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी असलेल्या आयओसीने संकेतस्थळावर सिलिंडरचे नवे दर प्रसिद्ध केले आहेत.
