एस पी घाळी चषक ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित 16 वर्षांखालील एस.पी. घाळी चषक ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनदिवशी व्ही.व्ही. सुपर किंग्ज संघाने बीएससी डेपो संघाचा दोन गडय़ांनी तर स्पार्टन संघाने एमसीसी संघाचा सात गडय़ांनी पराभव करून विजयी सलामी दिली. प्रभू कल्लोळी (सुपर किंग्ज), अद्वैत साठे (स्पार्टन) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर एसपी घाळी चषक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कर्ते सुधिंद घाळी, नागरत्ना हिरेमठ, सोमशेखर शिरगुप्पी, आदिनाथ हिरेमठ, तेजस कदम, सचिन कलवार, शाहीन, पूजा, संघ मालक संतोष रायकर, विजय कुलकर्णी, चिदंबर मडिवाळर, नियाज इनामदार, दयानंद हिरेमठ, हुसेन गोकाक, स्पर्धा सचिव परशराम पाटील, सचिन साळुंखे, रणजीपटू मिलींद चव्हाण आदि उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
बीएससी डेपो टागयर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकांत 5 बाद 144 धावा केल्या. कर्णधार आकाश कुलकर्णीने 7 चौकारांसह 47, आशुतोष हिरेमठने 3 चौकारांसह 28 धावा केल्या. सुपर किंग्जतर्फे मनिकांत बुकिटगार व अभय कुलकर्णी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सुपर किंग्ज संघाने 23.3 षटकांत 8 बाद 146 धावा करून सामना 2 गडय़ांनी जिंकला. एकवेळी 8 बाद 83 अशी केविलवाणी परिस्थिती असताना प्रभू कल्लोळी व वैभव के. यांनी डावाला सावरत 9 गडय़ांसाठी 63 धावांची अभेद्य भागिदारी करीत संघाला विजय मिळवून दिला. त्यात प्रभू कल्लोळीने 4 चौकारांसह 42 तर वैभव के. व मिराज हावेरी यांनी प्रत्येकी 3 चौकारांसह 31 धावा केल्या. बीएससीतर्फे हर्ष पटेल, आकाश कुलकर्णी व तन्मय यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
एमसीसी संघांने 10.3 षटकांत सर्व बाद 29 धावांच केल्या. या स्पर्धेती ही सर्वात निचांकी धावसंख्या आहे. सोहन कल्लूरने 10 धावा केल्या. स्पार्टनतर्फे अद्वैत साठे, आदी नलवडे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले तर चार फलंदाज धावचीत झाले. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्पार्टन संघाने 7.5 षटकांत 3 बाद 30 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. त्यात सुमीत भोसलेने 12 धावा केल्या. एमसीसीतर्फे सोहन कल्लूरने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे विजय कुलकर्णी, व्ही.टी. करीसकनावर, दयानंद हिरेमठ यांच्या हस्ते सामनावीर प्रभू कल्लोळी व इम्पॅट खेळाडू वैभव के. यांना चषक देवून गौरविण्यात आले तर दुसऱया सामन्यात संजीव हुलकुंद, चेतन हलसी, वीरेश गौडर यांच्या हस्ते सामनावीर अद्वैत साठे, इम्पॅट खेळाडू आदी नलवडे यांना चषक देवून गौरविण्यात आले.