‘कोरोना’नं जगावर आक्रमण केल्यास एक वर्ष उलटून गेलंय अन् आता त्याला पिटाळून लावण्यासाठी प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केलीय ती विविध राष्ट्रांतील लसींनी…याबाबतीत आघाडीवर आहे तो जगातील 62 टक्के ‘व्हॅक्सिन्स’ची निर्मिती करणारा भारत. आम्ही केवळ आपल्यापुरतंच मर्यादित न राहता विविध देशांना त्यांचा पुरवठा करण्यास प्रारंभ केला असून यामुळं नेहमीप्रमाणं अस्वस्थ झालाय तो कावेबाज चीन…
गोष्ट एका वर्षापूर्वीची…चीनमधील लाखो नागरिक ‘लॉकडाऊन’ला तोंड देत होते, तर अमेरिकेत नोंद व्हायला सुरुवात झाली होती ती ‘कोरोना व्हायरस’ प्रकरणांची…कुणालाही त्या खतरनाक ‘विषाणू’संबंधी फारशी कल्पना नव्हती, पण त्यानं अनेक देशांच्या सीमा, महासागर सहज ओलांडले…त्यानंतरच्या कालावधीत शास्त्रज्ञांनी जबरदस्त कामगिरीची नोंद करून ‘त्या’ व्हायरसला अडविण्याचा, जगाला वाचविण्याचा प्रयत्न केलाय…प्रचंड वेगानं कित्येक ‘व्हॅक्सिन्स’नी जन्म घेतलेला असला, तरी विश्वानं बुधवारी तब्बल 10 कोटी रुग्णांचा टप्पा ओलांडला…चिंतेची बाब म्हणजे सध्या तोंड द्यावं लागतंय ते विषाणूच्या वेगवेगळय़ा रूपांना…

‘कोव्हिड-19’नं जगभरातील सुमारे 1.3 टक्के नागरिकांना झोपविलंय, तर पार 21 लाख लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलंय. विश्लेषकांच्या मते, या विषाणूनं आक्रमण केल्यानंतरच्या काळात प्रत्येक 7.7 सेकंदात एक व्यक्ती संक्रमित झालीय. दरदिवशी दर्शन घडलंय ते सुमारे 6 लाख 68 हजार 250 प्रकरणांचं आणि मृत्यूचं प्रमाण 2.15 टक्के…‘कोरोना’मुळं दमछाक झालेल्या राष्ट्रांत समावेश करावा लागेल तो अमेरिका, ब्राझील, रशिया, इंग्लंड, स्पेन, इटली अन् भारत वगैरे देशांचा. जगात ज्यांना या रोगाला तोंड द्यावं लागलंय त्यात पन्नास टक्क्यांहून अधिक वाटा या राष्ट्रांतील रुग्णांचा…विशेष म्हणजे पहिल्या पाच कोटी प्रकरणांची नोंद झाली ती 11 महिन्यांत, तर त्यानंतरच्या फक्त तीन महिन्यांनी आणखी पाच कोटी जनतेला त्या यादीत ढकललं…
अमेरिकेनं तब्बल अडीच कोटी प्रकरणांचा टप्पा ओलांडलाय अन् विश्वातील रुग्णांत त्यांचा वाटा चक्क 25 टक्के. आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे जागतिक लोकसंख्येत महासत्तेचा हिस्सा केवळ 4 टक्के. दरदिवशी घडणाऱया मृत्यूंतदेखील अमेरिकेनं आघाडी मिळविलीय. प्रत्येक पाच बळींमध्ये समावेश ‘अंकल सॅम’च्या भूमीवरील एका व्यक्तीचा. तिथं अजूनपर्यंत मृत झालेल्यांची संख्या 4 लाख 30 हजारांहून अधिक. हा आकडा विश्वात दुसरा क्रमांक मिळविणाऱया ब्राझीलहून दुप्पट…
मात्र जगातील सर्वांत जास्त तडाखा बसलेला प्रदेश बनलाय तो युरोप. तिथं दर चार दिवसांनी सुमारे 10 लाख नवीन रुग्णांची भर पडतेय आणि महामारीला प्रारंभ झाल्यापासून तब्बल तीन कोटी नागरिकांवर ‘कोव्हिड-19’ला तोंड देण्याची वेळ आलीय…ब्रिटननं तर मंगळवारी बळींच्या बाबतीत एक लाखाचा आकडा ओलांडला…पूर्व युरोपचा विचार केल्यास रशिया, पोलंड, युक्रेन यांचा जागतिक ‘कोरोना’ महामारीत वाटा जवळपास 10 टक्के…खरं तर ‘व्हॅक्सिन’ बनविण्यास सुरुवात झाली ती युरोपमध्ये, पण ब्रिटनचा अपवाद वगळल्यास अन्य देश तोंड देताहेत ते लस मिळण्यासंदर्भातील विलंबाला…

काही दिवसांपूर्वी चीननं ‘कोरोना व्हायरस’चा फैलाव रोखण्यासाठी वुहानमध्ये विश्वातील जो पहिलावहिला ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला होता त्याचा वर्धापनदिन साजरा केलेला असला, तरी ‘ड्रगन’ सध्या तोंड देतोय तो एका नवीन लाटेला…श्रीमंत देशांमध्ये ‘व्हॅक्सिन्स’साठी जोरदार शर्यत लागलीय, परंतु सर्वांत बिकट परिस्थिती बनलीय ती आफ्रिका खंडाची. शिवाय विषाणूच्या नव्या रुपाची भर पडल्यानं दक्षिण आफ्रिका नि ब्रिटन यांची परिस्थिती अत्यंत खराब झालीय…आफ्रिकेतील देशांचा विचार केल्यास 35 लाख लोकांना ‘व्हायरस’नं पकडलंय, तर सुमारे 85 हजार नागरिकांना गारद केलंय…असो !
सध्या 56 देशांत ‘लसीकरण’ चालू असून साडेसहा कोटींहून जास्त लोकांनी आतापर्यंत ‘व्हॅक्सिन’ घेतलंय. आघाडी मिळविलीय ती 29 टक्क्यांहून अधिक नागरिकांना लस देणाऱया इस्रायलनं…26 जानेवारीपर्यंत भारतानं 28 लाख 47 हजार 608 लोकांना लस टोचलेली असून अन्य राष्ट्रांशी तुलना केल्यास आम्ही हा पराक्रम केवळ 11 दिवसात केलाय. याउलट बहुतेक देशांमध्ये गेल्या 50 दिवसांपासून ही मोहीम चाललीय. शिवाय 10 लाख लोकांना नवी दिल्लीनं सहा दिवसात लस दिली. अमेरिकेला त्यासाठी 10, स्पेनला 12, इस्रायलला 14, ब्रिटनला 18, इटलीला 19, जर्मनीला 20, तर संयुक्त अरब अमिरातीला 27 दिवस लागले…
दरम्यान, भारताच्या ‘व्हॅक्सिन’ मुत्सद्देगिरीनं दक्षिण आशियात चीनला ‘बॅकफूट’वर ढकललेलं असून त्यामुळं 20 देशांशी करार केलेला असूनसुद्धा ‘ड्रगन’च्या अंगाची लाहीलाही होऊ लागलीय…‘कम्युनिस्ट पक्षा’चं इंग्रजी दैनिक ‘ग्लोबल टाईम्स’नं सध्या प्रयत्न चालविलाय तो आपल्या मोहिमेला काळीमा लावण्याचा, ती डागाळून टाकण्याचा…नवी दिल्लीनं यापूर्वीच ‘सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’नं तयार केलेलं ‘कोव्हिशिल्ड व्हॅक्सिन’ अफगाणिस्तान व पाकिस्तानचा अपवाद सोडल्यास अन्य ‘सार्क’ राष्ट्रांना मोफत दिलंय. काबूलला ते मिळेल ‘स्थानिक नियमन अधिकारिणी’च्या परवानगीनंतर…भारतानं आतापर्यंत शेजारी राष्ट्रांना 55 लाख डोस एखादा रुपयासुद्धा न स्वीकारता भेटीदाखल दिलेले असून त्यात समावेश श्रीलंका (5 लाख डोस), नेपाळ (10 लाख), भूतान (1 लाख 50 हजार), मालदीव, मॉरिशस नि बाहरिन (प्रत्येकी 1 लाख), बांगलादेश (20 लाख), म्यानमार (15 लाख) अन् सेशेल्सचा (50 हजार). याखेरीज ओमानला 1 लाख, कॅरिबियन राष्ट्रांना 5 लाख, निकारागुआला 2 लाख, तर पॅसिफिक महासागरातील बेटवजा देशांना 2 लाख डोस पुरविण्यात येतील…शिवाय ब्राझील, मोरोक्को, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, म्यानमार (विकत घेणार 3 कोटी डोस), कॅनडा, मंगोलिया यांना व्यावसायिक तत्त्वावर ‘व्हॅक्सिन्स’ची विक्री करण्याची योजना आखण्यात आलेली असून त्यामुळं बीजिंगच्या डावपेचांना धक्का बसलाय…जोडीला भारतानं तयारी दर्शविलीय ती आफ्रिका खंडातील विविध राष्ट्रांना 1 कोटी डोस, तर ‘संयुक्त राष्ट्रसंघा’च्या आरोग्य कार्यकर्त्यांना 10 लाख डोस देण्याची…
‘ग्लोबल टाईम्स’नं भारताच्या ‘व्हॅक्सिन मैत्री’चा उल्लेख करून म्हटलंय की, ‘सिरम इन्स्टिटय़ूट’ला लागलेल्या आगीनंतर आपल्या लसीची निर्मिती करण्याच्या क्षमतेवर परिणाम झालाय अन् खुद्द भारतीय नागरिकांनाच चिनी ‘व्हॅक्सिन’ हवंय…विशेष म्हणजे कित्येक राष्ट्रांवर चीनचा आर्थिक व राजकीय प्रभाव मोठय़ा प्रमाणात असूनदेखील त्यांना नवी दिल्लीवर मात करणं जमलेलं नाहीये. ‘ड्रगन’समवेत सध्या एका ताटात जेवणाऱया नेपाळच्या ‘स्थानिक नियमन अधिकारिणी’नं त्यांच्या लसीला अजूनपर्यंत परवानगी दिलेली नाही, तर मालदीवला त्यांच्याकडून ‘व्हॅक्सिन’ दिलं जाणार की नाही याचीच खात्री नसल्याचं दिसून आलंय…आश्चर्यचकीत करणारी आणखी एक बाब म्हणजे मित्रराष्ट्र कंबोडियानं बीजिंगकडून 10 लाख डोस मिळूनही विनंती केलीय ती भारताला…बांगलादेशला खरं तर ‘सायनोव्हॅक बायोटेक’ या चिनी कंपनीकडून 1 लाख 10 हजार डोस फुकट मिळणार होते. पण शेख हसिना वाजेद यांच्या देशाचं डोकं गरम झालंय अन् कोंडी निर्माण झालीय ती ‘ड्रगन’नं ‘व्हॅक्सिन’ विकसित करण्याचा खर्च मागितल्यानं…
भारतानं बहुतेक दक्षिण आशियाई देशांनाच कवेत धरलंय आणि अन्य राष्ट्रांचा नवी दिल्लीनं तयार केलेल्या लसीच्या दर्जावर फारसा विश्वास नाही असेही तारे ‘ग्लोबल टाईम्स’नं तोडलेत…आपल्या देशातील काही राज्यांत आरोग्य कर्मचाऱयांनी ‘कोव्हॅक्सिन’ घेण्यास नकार दिला होता. त्या वर्तमानपत्रानं या मुद्याचं भांडवल करण्याची संधी सोडलेली नाहीये…चीनला आधार मिळालाय तो 5 लाख डोस मोफत मिळणार असल्यानं अगदीच हुरळून गेलेल्या दरिद्री पाकिस्तानचा ! – राजू प्रभू