महापालिकेचे नगरसेवक कोण? हे होणार स्पष्ट
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या 58 वॉर्डांकरिता शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या 385 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून सोमवारी मतमोजणीनंतर बेळगाव महापालिकेचे नगरसेवक कोण? हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी खूपच कमी मतदान झाले आहे. संपूर्ण 58 वॉर्डांमध्ये झालेल्या मतदानाची सरासरी 50.42 टक्के आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोणत्या उमेदवाराचा पराजय होणार? याबाबतच्या चर्चेला उत आला आहे. सोमवार दि. 6 रोजी मतमोजणी होणार असून बी. के. मॉडेल शाळेत सकाळी 8 पासून या प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. पण मतमोजणीसाठी दोन दिवसांचा वेळ असल्याने मतदानाबाबत चर्चेला उधाण आले आहे. काहींनी बुथस्तरीय मतदानाची आकडेवारी घेवून आपल्या उमेदवाराला किती मतदान होईल? याबाबत गणित घातले आहे. मीच विजयी होणार, असा विश्वास प्रत्येक उमेदवार व्यक्त करीत आहे. शहरातून गल्ली, कोपऱयावर झालेल्या मतदानाबाबत चर्चा सुरू आहे. पण मतदानाची घटलेली टक्केवारी चिंताजनक असून यापैकी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना किती मतदान होणार? याबाबत देखील आराखडे घालण्यात येत आहेत. तर झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना यश मिळण्याची शक्मयता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहून उमेदवारांना चिंता लागली असून हूरहूर लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून धावपळ करीत असलेल्या कार्यकर्त्यांना मतदानानंतर शांतता मिळाली. पण निवडणूक निकालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शहरवासियांसह सर्वांचेच लक्ष भावी नगरसेवक कोण? याकडे लागले आहे.