मंदिरांमध्ये स्वच्छतेसह आकर्षक आरास : सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी : कोरोना नियमावलीचे पालन करून दर्शन

प्रतिनिधी /बेळगाव
अनलॉक 3 झाले आणि मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे खुली करण्यास परवानगी मिळाली. सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून पुन्हा मंदिरे खुली झाली. यामुळे सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. सामाजिक अंतर राखत भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश देण्यात आला. तथापि काही मंदिरांनी अद्याप काही दिवस प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना देवाच्या दर्शनासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
शहरातील बहुसंख्य मंदिरे सोमवारी खुली करण्यात आल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शहापूर येथील अंबाबाई मंदिर, शिवबसवनगर व नार्वेकर गल्ली येथील जोतिबा मंदिर, मारुती गल्ली येथील मारुती मंदिर, हिंदवाडी येथील महालक्ष्मी मंदिर, शुक्रवारपेठ येथील ईस्कॉन मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर यासह इतर लहान-मोठी मंदिरे खुली करण्यात आली.
मंदिरे खुली होणार हे सरकारने स्पष्ट केल्याने मंदिर चालकांनी रविवारी स्वच्छतेचे काम हाती घेतले. गेल्या दोन महिन्यांपासून ‘देऊळ बंद’ असल्याने भाविकांच्या इतकीच मंदिर चालक, पुजारी व पुरोहितांचीसुद्धा घालमेल सुरू होती. तसेच दर्शनासाठी गर्दी होवू नये, यासाठी तशी दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.

कपिलेश्वर मंदिरात विशेष आरास
दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात दोन महिन्यांनंतर सोमवारी भाविकांना प्रवेश देण्यात आला. पहाटे 5 वा. मंदिर खुले करून रूद्राभिषेक, महाआरती करण्यात आली. 251 केळय़ांचा वापर करून आरास करण्यात आली. सचिन आनंदाचे व गणेश देवर यांनी आरास केली. कोरोना नियमावलीचे पालन करूनच भाविकांना दर्शन दिले जात असल्याचे मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री यांनी सांगितले.
हिंदवाडी येथील महालक्ष्मी मंदिर सोमवारी दर्शनासाठी खुले करण्यात आले. यानिमित्त मंदिराची खास रंगरंगोटी करून स्वच्छता केली. विशेष म्हणजे सोमवारी महालक्ष्मीची सालंकृत पूजा करण्यात आली. मंदिरांमध्ये गेलेले भाविक देवासमोर नतमस्तक होऊन कोरोनाचे हे संकट लवकर दूर होवो, अशी विनवणी करीत होते.
काही मंदिरे अद्याप बंदच…
शहर तसेच परिसरातील मंदिरे खुली करण्यात आली असली तरी अद्याप काही मंदिरे बंद आहेत. दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडून गर्दी होऊन कोरोनाचा धोका वाढू नये, यासाठी मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अजून काही दिवसांनी मंदिरे खुली केली जातील, असे ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आले.