विविध मंदिरांमध्ये श्रीराम मूर्तीला अभिषेक, कीर्तन, ज्ञानेश्वरी वाचनसह अखंड राम नाम जप : कोरोना नियमावलीचे पालन

प्रतिनिधी / बेळगाव
विश्वाचा विश्राम रे,
स्वामी माझा राम रे,
या रामाने कोरोना हटवावा रे,
अशी मनोमन प्रार्थना करत शहरात रामनवमी मोठय़ा भक्तीभावाने परंतु साधेपणाने साजरी करण्यात आली. शहरातील राम मंदिरांमध्ये यानिमित्त पुरोहितांनी पूजाअर्चा केल्या. कोरोना नियमावलीमुळे गाभारा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेतले.
शहापूर आचार्य गल्ली गाडेमार्ग येथील लोकमान्य श्रीराम मंदिरात रामनवमीनिमित्त सकाळी 7 वा. श्रीराम मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. 8 वा. ज्ञानेश्वरी वाचन झाले. 10 ते 12.30 पर्यंत हभप लव महाराज नार्वेकर यांचे श्री प्रभू रामजन्मावर कीर्तन झाले. 12.40 वा. पाळणा, आरती व तीर्थप्रसाद झाला. याप्रसंगी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक किरण ठाकुर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी संचालक अनिल चौधरी, संचालक सुबोध गावडे, संचालक गजानन धामणेकर, संचालक पंढरी परब, संचालक सेवंतीभाई शहा, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले, समन्वयक विनायक जाधव, राजू नाईक, मराठा बँकेचे संचालक शेखर हंडे, सुधीर कालकुंद्रीकर, मारुती देवगेकर, राजू आजगावकर, रवी शिग्गेहळ्ळीकर, राजू पाटील, वैजनाथ उच्चूकर, आकाश भेकणे, सतीश गावडोजी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
क्रांती महिला मंडळ, ओम प्रगती महिला मंडळ, श्रीराम सेवा समिती, ज्ञानेश्वर माउली भजनी मंडळाच्या सहकार्याने राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. उदय सौहार्द सहकारी सोसायटीचे चेअरमन जोतिबा तान्जी यांच्याहस्ते किरण ठाकुर यांचा सत्कार करण्यात आला.
रामदेव गल्लीतील राम मंदिरमध्ये पूजाअर्चा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर नागरिकांनी नियमांचे पालन करून श्रीरामाचे दर्शन घेतले. केळकरबागेतील राम मंदिरात सकाळी 8 ते 9 रामनाम जप झाला. 10 ते 11 या वेळेत रामरक्षा पठण व मारुती स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम जप करण्यात आला. 12.15 वा. भजन झाले. राम जन्मानंतर 12.30 वा. आरती झाली.
किल्ला येथील सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या आराधना विशेष मुलांच्या शाळेत रामनवमी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी श्रीरामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी शिक्षक रशिदभाई, मारुती कुंभार, द्वारका पाटील, किशोरी जुवेकर, नंदा लोहार, अश्विनी पोवार आदी उपस्थित होते.
शरबताबाई चौगुले यांचा हनुमान जयंतीपर्यंत अखंड राम नाम जप
गँगवाडी येथील राम व हनुमान मंदिरामध्ये शरबताबाई चौगुले यांनी रामनवमीपासून राम जपला प्रारंभ केला. हनुमान जयंतीपर्यंत त्या अखंड जप करणार आहेत. रामाची कृपा रहावी व कोरोना हद्दपार व्हावा, अशी प्रार्थना आपण केल्याचे त्यांनी सांगितले.