विकेंड लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद

प्रतिनिधी / बेळगाव
विकेंड लॉकडाऊनच्या दुसऱया दिवशीही बेळगावमध्ये शुकशुकाट व शांतता दिसून आली. रविवारी सकाळपासूनच रस्ते सुनसान होते. दुधाची दुकाने, वृत्तपत्र विपेते, मेडिकल व इतर वैद्यकीय सेवा सुरू होत्या. या व्यतिरिक्त शहर व उपनगरांमध्ये सन्नाटा होता. रविवारचा दिवस नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसोबतच घालविला.
जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या अद्यापही कमी झालेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. मागील आठवडय़ानंतर या आठवडय़ातही पुन्हा विकेंड लॉकडाऊन करण्यात आला. शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत हा विकेंड लॉकडाऊन आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. नागरिकांनी स्वयंशिस्तीने लॉकडाऊनचे नियम पाळल्याने रविवारी पोलीसही रिलॅक्स झाले होते.

विनाकारण फिरणाऱयांना पोलिसांनी हटकल
कडक लॉकडाऊन असतानाही काहीजण मात्र दुचाकीवरून सवारी करताना दिसत होते. पोलिसांची नजर चुकवून फिरणाऱयांची संख्याही अधिक होती. परंतु असे निदर्शनास येताच पोलीस त्यांना हटकत होते. काहींवर तर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. काहींना पोलिसांनी माघारी धाडले. काही ठिकाणी पोलीस येणाऱया-जाणाऱया वाहनांचे क्रमांक टिपून घेताना दिसून आले.
शेतीची कामे जोमात

शहरालगत असणाऱया शिवारांमध्ये भात पेरणीची कामे जोमात सुरू आहेत. जुने बेळगाव, वडगाव, शहापूर, अनगोळ परिसरातील नागरिकांनी विकेंड लॉकडाऊनमध्ये पेरणी आटोपून घेतली. मागील आठवडय़ात पाऊस झाल्याने पेरणीसाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे पोलिसांची नजर चुकवून शेतकरी शेतांमध्ये पेरणी करण्यासाठी जात असल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले.