पूर्वापार काळापासून कोणतीही जबाबदारी पार पाडण्यात महिला पारंगत : कौटुंबिक अडचणींवर मात करून अनेक महिला सत्कारास पात्र
प्रतिनिधी / बेळगाव
कै.नारायण जाधव प्रतिष्ठानतर्फे महिलांचा सत्कार

ज्या स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला जायला भीती वाटत होती, त्याच स्मशानभूमीत 45 कोरोनाबाधित मृत व्यक्तींवर मी अंत्यसंस्कार केले. रुग्णवाहिका मी स्वतः चालविली, त्यामुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, यापुढेही माझे सामाजिक कार्य सुरूच राहील, असे उद्गार सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांनी काढले. कै. नारायण जाधव प्रतिष्ठान आयोजित महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
याप्रसंगी माधुरी जाधव यांच्यासह सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सुनिता मोहिते, कंग्राळ गल्लीतील सामाजिक कार्यकर्त्या अंजना शंभुचे यांचा प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मालोजी अष्टेकर, उपाध्यक्ष नेताजी जाधव, सचिव व्ही.बी. जाधव गुरुजी, सदस्य अनंत लाड, गोपाळराव बिर्जे, प्रभाकर भाकोजी होते.
इ. एस. जाधव यांनी प्रास्ताविक केले. नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक केले व प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. सत्कारमूर्तींचा परिचय अनंत लाड यांनी करून दिला. त्यांचा सत्कार नंदा जाधव, श्रुती जाधव व वैशाली जाधव यांच्या हस्ते गुलाबपुष्प, श्रीफळ व फुलांचे रोपटे देऊन करण्यात आला. वडगाव आरोग्य केंद्राचे डॉ. मारुती कामकर यांनी क्षयरोग, त्याची लक्षणे व उपाय याबद्दल माहिती दिली. सुनिता मोहिते यांनी महिलांनी संघर्षाला तेंड देण्यासाठी सक्षम व्हावे, असे सांगितले. अंजना शंभुचे यांनी स्त्रियांनी आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.
मालोजी अष्टेकर यांनी सत्कारमूर्ती तिन्ही महिलांच्या कार्याचा आढावा घेतला. चिमन जाधव यांनी आभार मानले. याप्रसंगी बापू जाधव, विजय जाधव, पूजा जाधव, भारती जाधव, युवराज जाधव, साईराज जाधव, सुमंत जाधव यांच्यासह वडगाव, शहापूर, भारतनगर, जुनेबेळगावमधील अनेक महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अनंत लाड यांनी केले.
महिला सक्षमीकरण मंच

केएलई सोसायटीच्या आरएलएस संस्थेच्या महिला सक्षमीकरण मंचतर्फे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सहकार्याने महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त कौटुंबिक कायदा या विषयावर कायदा जागृती कार्यशाळा घेण्यात आली. प्रमुख वक्त्या म्हणून कौटुंबिक न्यायालय (फॅमिली कोर्ट) च्या न्यायाधीश वेला खोटे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्या जे. एस. कावळेकर उपस्थित होत्या.
न्यायाधीश खोटे यांनी आपण हाताळलेल्या अनेक कौटुंबिक खटल्यांची उदाहरणे देऊन वैवाहिक जीवन कसे आनंदी करता येईल, यावर मार्गदर्शन केले. मोफत कायदा सेवाच्या ऍड. ज्योती हिरेमठ यांनी महिलांचे हक्क या विषयी माहिती दिली. जामीन आणि अजामीनपात्र गुन्हा यावर विवेचन केले. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी पोलीस महिलांना, महिलांसाठी व जनतेसाठी असलेल्या सुविधांबद्दल माहिती दिली. महिलांना कोणत्या कारणाखाली अटक करता येते, याबद्दल मार्गदर्शन केले. तिसऱया सत्रात ऍड. बना कौजलगी यांनी कौटुंबिक कायद्यांवर माहिती दिली.
शेवटच्या सत्रात आरएल लॉ कॉलेजच्या प्रा. अश्विनी परब यांनी महिला आणि संपत्तीमधील त्यांचा हक्क यावर मार्गदर्शन केले. प्रारंभी रोज मोंतेरो यांनी स्वागतगीत सादर केले. प्रा. एच. आय. हंपन्नवर यांनी स्वागत केले. प्रा. एस. आर. माने यांनी परिचय करून दिला. दिव्या परुळेकर यांनी सूत्रसंचालन, प्रा. एम. एम. पुराणिक यांनी आभार मानले.
वेदांत सोसायटी

पूर्वापारपासून महिलांना अनेक जबाबदाऱया पार पाडाव्या लागत आहेत. आधुनिक युगातही महिलांवर जबाबदारी व अपेक्षांचे ओझे वाढलेले आहे, असे प्रतिपादन बेळगाव महिला पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी केले.
भारतनगर येथील वेदांत सोसायटीच्या सभागृहात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात श्रीदेवी पाटील बोलत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून नीलिमा लोहार उपस्थित होत्या. पाटील आणि नीलिमा लोहार यांचा वेदांत सखीच्या पल्लवी सायनेकर, श्रद्धा मोरे, सुप्रिया कारेकर, सविता वेसणे, नितल तुळजाई यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्रीदेवी पाटील यांनी आजच्या महिलांना अनेक जबाबदाऱया पार पाडाव्या लागत आहेत. विविध क्षेत्रात महिला महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. अशा वेळी महिलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. वेदांत सखीच्या अध्यक्षा सविता सायनेकर यांनीही विचार व्यक्त केले. वेदांत सोसायटीचे चेअरमन संदीप खन्नुकर व माजी चेअरमन कृष्णा सायनेकर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. पल्लवी सायनेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. श्रद्धा मोरे यांनी आभार मानले. यावेळी माधवबाग संस्थेच्या आरोग्य शिबिराचे डॉ. सागर मित्तल व डॉ. प्रसाद देशपांडे उपस्थित होते.
विमल महिला सोसायटी

विमल महिला सोसायटीच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बेळगाव तालुक्मयातील पहिली महिला कुस्तीपटू एन.आय.एस. कोच महणून निवड झाली. ती कंग्राळी गावची सुपुत्री पैलवान पूनम शिवनगेकर हिचा संस्थेच्या चेअरमन सुनीता हलगेकर व पद्मजा पाटील व संचालिका मंडळाच्यावतीने शाल स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पद्मजा पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. अडचणींवर मात करून अशा सत्कारमूर्ती तयार होत असतात, अशी भावना व्यक्त केली. सुनीता हलगेकर यांनी महिला सबलीकरण व त्यांचा समाजामधील वाढता सहभाग, शेतातील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत शिक्षिका, डॉक्टर, पायलट, पोलीस, खेळाडू अशा अनेक क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी बजावली आहे, असे मनोगत व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या. रेश्मा शेठ यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
श्री कालिका दैवज्ञ मंडळ

जालगार गल्ली येथील श्री कालिका दैवज्ञ मंडळाचा महिला दिन शुभांगी कारेकर यांच्या फार्महाऊसवर साजरा करण्यात आला. यावेळी विविध खेळ घेऊन विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभांगी यांच्यासह उपाध्यक्षा सुलभा कारेकर सचिव नीता शिरोडकर, खजिनदार शैलजा कारेकर, उपखजिनदार नम्रता महागावकर यांनी परिश्रम घेतले.
देशात सर्वात जास्त कर्नाटकातच महिला सुरक्षित : प्रा. विजयालक्ष्मी पुट्टी यांचे मत

महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत, ही बाब अत्यंत सुखद आहे. महिलांच्यामुळेच कुटुंब एकत्र राहू शकते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. यापुढेही महिलांनी आपले कुटुंब सांभाळताना कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्या नेहमीच यशस्वी होतात, असा विश्वास प्राध्यापिका विजयालक्ष्मी पुट्टी यांनी व्यक्त केले. कर्नाटकमध्ये सर्वात जास्त महिला सुरक्षित आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बार असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश सी. एन. जोशी, बार असोसिएशन उपाध्यक्ष गजानन पाटील, उपाध्यक्ष ऍड. सी. टी. मजगी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रा. विजयालक्ष्मी पुढे म्हणाल्या, महिलांनी केवळ आपल्या कुटुंबात न राहता सामाजिक कार्यामध्येहीही भाग घेणे गरजेचे आहे. मलाही वकील व्हायचे होते. मात्र, मी होऊ शकले नाही. मी शिकविलेले विद्यार्थी आज वकील झाले आहेत. याचा मला अभिमान आहे, असे सांगून त्यांनी महिलांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.
यावेळी मुख्य जिल्हासत्र न्यायाधीश सी. एम. जोशी यांनीही आपले विचार व्यक्त केले. न्यायाधीश संध्या राव, न्यायाधीश वेला खोटे यांनीही मत मांडले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अधिवक्ता परिषदेच्या उपाध्यक्षा मंजुळा पडसूर यांनी स्वागत केले. अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष सदाशिव हिरेमठ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ यांच्यासह वकील मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कोरोनाबाबत काळजी घेणे आवश्यक : ज्योती होसट्टी यांचे प्रतिपादन

कोरोनाने सर्वाधिक दमक्षाक केली ती आरोग्य खात्यातील कर्मचाऱयांची. कोरोना अचानक आला आणि आम्हाला कार्यालयात आल्या आल्या गटागटांनी विविध खेडय़ांत पाठविण्यात आले. स्वॅब कलेक्शनचे काम आमच्याकडे होते. एका खेडय़ातील लोक ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी आमच्यावर चक्क दगडफेक केली. तेथून बाहेर येईपर्यंत महामार्गावर गाडी बंद पडली. अशा अनेक संकटांशी आम्ही सामना केला. त्यामुळे जनतेने आजही कोरोनाबाबत काळजी घेणे आवश्यक आहे, अशा भावना लॅब टेक्निशीयन ज्योती होसट्टी यांनी व्यक्त केल्या.
मराठा महिला मंडळातर्फे बुधवारी महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांचा व सफाई कर्मचारी यल्लव्वा गोल्हर यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ज्योती बोलत होत्या. व्यासपीठावर मंडळाच्या अध्यक्षा अरुणा काकतकर व सचिव विद्या कणबरकर उपस्थित होत्या.
ज्योती यांनी कोरोना काळातील अनुभव कथन केले तसेच मुलांना जलतरण शिकण्यासाठी घेऊन जाताना आपण सुद्धा जलतरण शिकून राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धांमध्ये सहभागी होवून सुवर्णपदके मिळविली असे सांगितले. यल्लव्वा गोल्हर यांनी सफाई कर्मचाऱयांमुळे प्रत्येक घराची आणि शहराची स्वच्छता होते. पण त्यांनाच उपेक्षेने पाहिले जाते, असे सांगितले. किमान कचऱयाचे वर्गीकरण करुन दिले तरी आम्हाला मदत होईल, असे त्या म्हणाल्या.
प्रारंभी अरुणा काकतकर यांनी प्रास्ताविक केले. आरती सांबरेकर यांनी ओळख करून दिली. संजीवनी खंडागळे यांनी विविध स्पर्धेतील विजेत्यांची नावे वाचली. सूत्रसंचालन रेणू पवार यांनी केले. मिनल बडवाण्णाचे यांनी आभार मानले. याच कार्यक्रमात यल्लव्वा यांना सर्व सदस्यांच्यातर्फे अर्थसाहाय्य करण्यात आले.