प्रतिनिधी/ बेळगाव
येथील कारंजीमठात रविवारी बेळगाव लिंगायत संघटनेच्यावतीने विश्वगुरु आणि लिंगायत धर्म संस्थापक बसवेश्वर यांची 887 वी जयंती साजरी करण्यात आली. बसव जयंतीनिमित्त यावेळी मुख्यमंत्री मदतनिधीला 2 लाख 61 हजाराची मदत देऊन अर्थपूर्णरित्या बसवजयंती साजरी करण्यात आली. शिवबसवनगर येथील कारंजीमठात झालेल्या या कार्यक्रमात कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध महास्वामीजी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी आणि आमदार अनिल बेनके यांच्याकडे मठाच्यावतीने मुख्यमंत्री मदतनिधीला 2 लाख 61 हजाराचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.
यंदा लॉकडाऊनमुळे जयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध महास्वामीजी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके आणि लिंगायत संघटनेच्या पदाधिकाऱयांच्यावतीने विश्वगुरु बसवेश्वर यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी मदतीबद्दल लिंगायत संघटनेचे आभार मानले. तसेच बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. लिंगायत संघटनेचे अध्यक्ष इरण्णा दयेन्नवर यांनी संपूर्ण देश संकटात असून मुख्यमंत्री साहाय्यता निधीला संघटनेच्यावतीने अर्थसाहाय्य केल्याचे सांगितले.
कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध महास्वामीजी यांनी दरवर्षी शिवबसव जयंती मोठय़ा प्रमाणात साजरी करण्यात येत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या महामारीमुळे आणि नियमावलीमुळे घरीच जयंती उत्सव साजरी करत असल्याचे सांगितले. कोरोनाविरुद्ध लढय़ात सहभागी होण्याच्या उद्देशाने मठाच्यावतीने 2 लाख 61 हजार रुपयाची मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी लिंगायत संघटनेचे प्रमुख सतीश पाटील, रमेश कळसण्णवर, राजू चिक्कनगौडर, व्ही. के. पाटील, सदाशिव देवरमनी, सुरेश नरगुंद, संगमेश अरळी, शशीभूषण पाटील, विजय हुदलीमठ, मल्लिकार्जुन पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने बसव जयंती
महामानवतावादी लिंगायत धर्म संस्थापक विश्वगुरु बसवेश्वर यांची 887 वी जयंती प्रशासनाच्यावतीने साजरी करण्यात आली. गोवावेस बसवेश्वर सर्कल येथील उद्यानात असणाऱया बसवेश्वर मूर्तीचे पूजन करून जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महापालिका जगदीश के. एच. आदींच्या हस्ते बसवेश्वर मूर्तीचे पूजन करण्यात आले. मंत्री सुरेश अंगडी यांनी यावेळी बोलताना बसवेश्वर यांच्या शिकवणुकीची आज गरज असल्याचे सांगितले. संत बसवेश्वर यांनी 12 व्या शतकात अनुभव मंटपाची स्थापना करून भारतात खऱया अर्थाने लोकशाहीचा पाया घातल्याचे सांगितले. जाती, पंथ, अस्पृश्यता, भेदभावपणा या विरोधात त्यांनी लढा देऊन समाजात समानतेची भावना रुजवली, असे अंगडी यांनी सांगितले.
आमदार अनिल बेनके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या आवाहनामुळे यावर्षी जयंती उत्सव साधे करत असल्याचे सांगितले. नियमांचे पालन करून जयंती उत्सव साजरी होत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महापालिका आयुक्त जगदीश के. एच., ऍड. एम. बी. जिरली, रत्नप्रभा बेल्लद, कन्नड आणि सांस्कृतिक खात्याच्या साहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री, माजी नगरसेवक रमेश कळसण्णवर, माजी उपमहापौर ज्योती भावीकट्टी यांच्यासह अन्य उपस्थित होते.
नागनूर रुद्राक्षी मठ
येथील नागनूर रुद्राक्षी मठात रविवारी विश्वगुरु बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मठाचे श्री डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी यांच्या नेतृत्त्वाखाली आणि मठाच्या साधकांच्या उपस्थितीत यंदाची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. तर लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या काही गरजूंना जीवनावश्यक आहारधान्याचे स्वामीजींच्या हस्ते वितरण करण्यात आले. डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी यांच्या हस्ते विश्वगुरु बसवेश्वर यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.