वनविभाग पोलिसांनी केली एकाला अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर येथील एकाने वाघनखे आणि हस्तिदंताच्या अंगठय़ा बनवून घेऊन त्या विक्री करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती वनविभागाच्या पोलीस उपनिरीक्षिका रोहिणी पाटील यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून काकेरू चौक येथे एकाला अटक करून त्याच्याकडील वाघनखे आणि हस्तिदंताच्या अंगठय़ा जप्त केल्या आहेत.

श्रीराम अर्जुनसा बाकळे (वय 46, रा. खडेबाजार, शहापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने बेकायदेशीररीत्या हस्तिदंताच्या अंगठय़ा बनवून घेतल्या होत्या. याचबरोबर वाघाची नखेही त्याच्याकडे आढळली. वनविभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली. दोन अंगठय़ा आणि पाच वाघनखे जप्त केली. या प्रकरणी वनविभाग संरक्षण कायदा क्र. 9, 39, 44, 51 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयात हजर करण्यात आले.
वनविभागाच्या पोलीस उपनिरीक्षिका रोहिणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत के. डी. हिरेमठ, जीपचालक बी. बी. इंगळगी यांच्यासह इतरांनी भाग घेतला. वन्यप्राण्यांच्या तस्करीविरोधात वनविभागाच्या पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे.