प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूरमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक विकासकामे राबविण्यात येत आहेत. परंतु ती करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. काकेरू चौकात रस्त्यामध्येच डेनेजचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे ते धोकादायक ठरत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नेहमीच वर्दळीचे ठिकाण असणाऱया या चौकात डेनेजची वाहिनी खोदण्यात आली आहे. या चौकातूनच दोन गल्ल्यांमध्ये रस्ता जातो. त्यामुळे नेहमीच वाहनांची ये-जा असते. स्मार्ट सिटीअंतर्गत बँक ऑफ इंडिया सर्कलपासून ते नाथ पै चौकपर्यंतच्या मार्गाचे क्राँक्रिटीकरण व ड्रेनेज पाईपलाईन करण्याचे काम करण्यात येत आहे. परंतु हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. या मार्गावरील बरीच कामे अर्धवट स्थितीमध्ये पडली आहेत.
गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करा
या काकेरू चौकात सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रति÷ापना करण्यात येते. गणेशोत्सव अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी गणेशभक्तांमधून होत आहे. काम अपूर्ण राहिल्यास गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी होणार आहे. मंडप घालतानाही अडचणी येणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.