शांतता- सलोखा राखण्याचे आवाहन : पोलीस, शिक्षण खात्यावरील ताण वाढला : समाजकंटकांवर करडी नजर

प्रतिनिधी /बेळगाव
नववी आणि दहावीचे वर्ग सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सरदार्स हायस्कूलमध्ये अनुचित प्रकार घडला होता. त्याची गंभीर दखल घेत मंगळवारी सर्वच शाळांतील बंदोबस्त वाढविण्यात आला. परिणामी, शाळा परिसरात दहशतीचे वातावरण होते. बुधवारपासून महाविद्यालयेही पूर्ववत सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि शिक्षण खात्यावरील ताण वाढला आहे.
शाळा उघडण्यापूर्वीच पोलीस अधिकारी त्यांच्या कुमकेसह शहरातील प्रमुख माध्यमिक शाळांसमोर उपस्थित होते. पोलिसांची वाहने आणि विद्यार्थ्यांवरील त्यांची नजर यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीची छाया असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. दिवसभर पोलीस अधिकाऱयांच्या वाहनांची प्रत्येक शाळेसमोरून वर्दळ सुरू होती. त्यामुळे प्रथमच शाळांना पोलिसी दहशतीचा अनुभव येत आहे. मात्र या परिस्थितीचा अध्यापनावर परिणाम झाला नसल्याचा दावा शिक्षण खात्याकडून करण्यात आला आहे.
सरदार्स हायस्कूल व इस्लामिया हायस्कूलला सकाळी काही काळ पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या असल्या तरी समाजकंटकांकडून गोंधळ माजविला जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जात होती. बुधवारपासून महाविद्यालये सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व समाजातील जाणकारांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. शांतता व सलोखा राखला जावा, असे आवाहन पोलीस आणि शिक्षण खात्याने केले आहे.
परीक्षा तोंडावर, ताण डोकीवर
आधीच अर्धे शैक्षणिक वर्ष वाया गेले. शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याच्या काही दिवसातच पुन्हा लॉकडाऊनचे संकट ओढवले. आता हिजाब प्रकरण उद्भवले आहे. सध्या प्रकरण निवळले असले तरी दररोजचा ताण विद्यार्थ्यांवर आहे. परीक्षा तोंडावर असतानाच या प्रकाराचा त्यांच्यावर परिणाम होण्याची भीती पालक व्यक्त करीत आहेत.