आधारकार्डचे झेरॉक्स, पालकांच्या संमतीपत्राची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्याने केंद्र व राज्य सरकारने 15 ते 18 वयोगटातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 3 जानेवारीपासून शाळा व पदवीपूर्व महाविद्यालयात लसीकरण केले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत व पालकांच्या संमतीचे पत्र घेऊन येण्यास सांगण्यात आले आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे महाविद्यालयांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात आले. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर आता 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. बेळगाव जिल्हय़ात या वयोगटातील अंदाजे 6 लाख विद्यार्थी आहेत. त्यांना सोमवारपासून लस दिली जाणार आहे. शाळा व पीयू कॉलेजमध्ये लसीकरणाची व्यवस्था केली आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा धोका कमी होत असल्यामुळे 15 वर्षांवरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
लसीकरणाची व्यवस्था कॉलेजमध्ये करण्यासाठी सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे तशा सूचना शाळा व महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना लस दिली जाणार आहे. आधारकार्ड व पालकांच्या मोबाईलच्या साहाय्याने लसीकरणाची नोंद केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सहामाही परीक्षा लांबणीवर
माध्यमिक विद्यालयांमधील सहामाही परीक्षांना सोमवार दि. 3 पासून सुरुवात होणार होती. परंतु या सहामाही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा अंदाज आहे. 10 जानेवारीनंतर नवीन वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.