माडखोल केंद्रशाळा मुख्याध्यापक अरुण म्हाडगुत यांचे भावोद्गार : सेवानिवृत्तीनिमित्त मोजक्या सहकाऱयांच्या उपस्थितीत सत्कार
प्रतिनिधी / ओटवणे:
उज्ज्वल व गौरवशाली परंपरा लाभलेल्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून गेली नऊ वर्षे काम करायची मला संधी लाभली, हे माझे भाग्य आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ यांचे उत्कृष्ट सहकार्य मिळाल्यानेच एक आदर्श शाळा निर्माण झाली. सर्वांच्या सहकार्यामुळेच मी शाळेचा गुणत्मक दर्जा टिकवून ठेवू शकलो, याचा आनंद होत आहे, असे भावोद्गार माडखोल केंद्रशाळेचे मुख्याध्यापक अरुण म्हाडगुत यांनी काढले.
आदर्श माडखोल केंद्रशाळेचे मुख्याध्यापक तथा दुकानवाड-हळदीचे नेरुर गावचे सुपुत्र अरुण म्हाडगुत आपल्या 33 वर्षांच्या शैक्षणिक सेवेनंतर सोमवारी निवृत्त झाले तर मंगळवारी त्यांचा वाढदिवस होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सेवानिवृत्ती व वाढदिवस कार्यक्रम न घेता मोजक्याच सहकाऱयांच्या उपस्थितीत त्यांचा अत्यंत साधेपणाने गौरव करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हाडगुत बोलत होते.
यावेळी शाळेसाठी भव्य क्रीडांगण, वाचनालय, संगणक कक्ष या आधुनिक शैक्षणिक सुविधांसाठी राजन राऊळ, जिजी राऊळ, सुरेश आडेलकर, शांताराम माडखोलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे चांगले सहकार्य लाभल्याचा अरुण म्हाडगुत यांनी आवर्जून उल्लेख केला. तसेच शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचेही आपल्याला प्रोत्साहन मिळाले असून शाळेतील सहकारी शिक्षकांची समर्थ साथ लाभल्याने शाळेचा गुणात्मक दर्जा आपण टिकवू शकलो असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी त्यांच्या शाळेतील सहकारी शिक्षक व शांताराम माडखोलकर यांच्यावतीने म्हाडगुत यांना सोन्याची भेटवस्तू देण्यात आली. दरम्यान, म्हाडगुत यांना त्यांच्या सेवानिवृत्ती व वाढदिवसाचे औचित्य साधून माणगाव खोऱयासह सावंतवाडी तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फोनवरून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस म. ल. देसाई, अमोल पाटील, शांताराम माडखोलकर, वैशाली माडखोलकर, भरत गावडे, दत्ताराम सावंत, शाळेच्या मुख्याध्यापिका विशुदा आजगावकर, रश्मी सावंत, स्वप्नजा खानोलकर, ज्योती परब, दीपक पंडित, प्रवीण ठाकर आदी उपस्थित होते.