सांगरूळ /प्रतिनिधी
सांगरूळ तालुका करवीर येथे मोहरम निमित्त पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आलीअसून शासन आदेशाचे पालन करत धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेला व शेकडो वर्षापासून साजरा केला जाणारा सांगरूळ तालुका करवीर येथील मोहरम ( अलावा ) दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . पण चालू वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशाचे पालन करत मोहरम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.
मोहरम हा सण दहा दिवसाचा असतो पहिल्या दिवशी चंद्रदर्शन करून गाव कामगार पाटील व मान्यवरांच्या हस्ते खाईत कुदळ मारुन मोरची सुरुवात केली जाते. त्यानंतर खाडे व नाळे किल्लेदार, सन्नके, खाटीक, अंबी समाजाच्या पाच स्वाऱ्यांचे पंजे बसवले जातात. मोहरमच्या सातव्या दिवसापासून पंजाना नैवेद्य, हारतुरे कपडे चढवले जातात .मोहरमच्या मुख्य दिवशी म्हणजे खत्तल रात्र रोजी रात्री खाई पेटवून उड्या मारणे करबले खेळणे, शिगा लावणे आदी कार्यक्रम केले जातात. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात पंजे साहेब पीर दर्ग्याच्या भेटीस जातात. ताबूत विसर्जन दिवशी सवाद्य मिरवणुकीने पंजे विसर्जनासाठी जातात.
चालू वर्षी गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी चंद्रदर्शन पाहून पोलिस पाटील बाजीराव खाडे व माजी सरपंच आनंदराव नाळे तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खाईत कुदळ मारून मोहरमला सुरुवात झाली. यानंतर पंजांच स्थापना करण्यात आली. शनिवारी कत्तल रात्र असून रविवारी ताबूत विसर्जन आहे.
चालू वर्षी कोरोनाविषाणू च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या आदेशाचे पालन करत मशिदीचे ट्रस्टी मुल्ला घराण्याने मोहरमचे सर्व धार्मिक कार्यक्रम सुरू ठेवले आहेत. मोहरमला सुरुवात झाल्यानंतर मशिदीचा झेंडा संपूर्ण गावातून सवादय मिरवणुकीने जात होता घरोघरी याची पूजा केली जात होती. मोहरमच्या मुख्य दिवशी पै पाहुण्यांना जेवणासाठी निमंत्रित केले जात होते . तसेच गावामध्ये मोहरम निमित्त विविध विक्रेत्यांची व दुकाने मांडली जात होती. विविध खेळाची व मनोरंजनाची साधने येत होती. पण चालू वर्षी धार्मिक उपक्रमा शिवाय इतर सर्व उपक्रम बंद आहेत.