ऑनलाइन टीम / पुणे :
आपल्या कसदार गायकीने बंदिशींद्वारे विविध रागांचे सौंदर्य उलगडत आणि आलाप-तानांची अप्रतिम फिरत दर्शवित गायक पं. आनंद भाटे यांनी रसिकांवर आपल्या सुरेल गायकीची मोहिनी घातली. शास्त्रीय संगीत, नाट्यगीते आणि भक्तीगीतांनी सजलेल्या स्वरमयी संध्येमध्ये रसिक मंत्रमुग्ध झाले.
नारायण पेठेतील प.प. शिरोळकर स्वामी महाराज द्वारा संस्थापित आणि प.प.एरंडे स्वामी महाराज द्वारा संवर्धित श्रीमत् जगद्गुरु श्रीशंकराचार्य मठातर्फे मठाचे संस्थापक प. प. श्री शिरोळकर स्वामी महाराज यांच्या ६१ व्या समाराधना (पुण्यतिथी) उत्सवानिमित्त गायक पं. आनंद भाटे यांच्या सुश्राव्य गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प. प. श्री. वामनानंद सरस्वती स्वामी महाराज, विनया देव, स्वाती दिवेकर, अमर चक्रदेव, अभिषेक दुबे, यश रामलिंगे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पुरिया धनाश्री रागाने झाली. यामधील झपतालातील पार करो अरज सुनो… या बंदिशीच्या सादरीकरणाने रसिकांनी सुरेल गायनाची अनुभूती घेतली. यानंतर याच रागातील दृत तीनतालातील पायलीया झनकार मोरी… या बंदिशीला रसिकांनी भरभरून दाद दिली. शंकरा रागामधील दोन बंदिशींच्या सादरीकरणामध्ये रसिक तल्लीन झाले. संत कान्होपात्रा नाटकातील संत ज्ञानेश्वर यांनी रचलेल्या अवघाचि संसार सुखाचा करीन… या नाट्यगीताला रसिकांनी मनापासून दाद दिली. संत ज्ञानेश्वर यांनी रचलेल्या कान्होबा तुझी घोंगडी… या अभंगाने रसिक भक्तीरसात न्हाऊन गेले. विविध रागांमधील बंदिशी, नाट्यगीते, अभंगांच्या सादरीकरणाने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
गायक पं. आनंद भाटे यांनी गीतांचे सादरीकरण केले. त्यांना भरत कामत (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम), माऊली टाकळकर (टाळ), अभिषेक ढिले (तानपुरा) यांनी साथसंगत केली. स्वाती दिवेकर यांनी निवेदन केले.