महानगरपालिकेने घेतली दखल
प्रतिनिधी/ बेळगाव
शाहूनगर परिसरातील सांडपाणी कंग्राळी बुद्रुक गावच्या सुपीक जमिनीत शिरुन पिकांचे नुकसान होत होते. त्यामुळे कंग्राळी ग्रामपंचायतीने माती टाकून गटार अडविली होती. गुरुवारी दुपारी महानगरपालिकेच्या अधिकाऱयांनी माती बाजूला काढून गटार खुली केली. याबाबत तरुण भारतने गुरुवारी वृत्त प्रसिद्ध केले होते.
मंगळवारी कंग्राळी ग्रामपंचायतीच्यावतीने काम सुरू असलेल्या गटारीत माती टाकून ती बुजविण्यात आली होती. मात्र याचा फटका स्थानिक नागरिकांना बसला होता. दोन दिवसांत सांडपाण्याने गटार तुंबून किडय़ांचा प्रादुर्भाव वाढला होता. स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे तक्रार केली होती.
गुरुवारी महानगरपालिकेचे साहाय्यक कार्यकारी अभियंते बी. बी. चौगुला, कनिष्ठ अभियंते ईश्वर कणबूर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून जेसीबीच्या साहाय्याने गटारीतील माती बाजूला काढली. माती हटविताना भूमिगत गॅसपाईप लाईन फुटून गळती सुरू झाली होती. त्यामुळे एकच तारांबळ उडाली होती. संबंधितांनी तातडीने ती दुरुस्त केली. सध्या शाहूनगर परिसरात गटारांचे काम सुरू आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या पुढाकारातून ही विकास कामे राबविण्यात येत आहेत. गटारांचे काम करण्याआधी पाणीपुरवठा मंडळाने पाण्याचे पाईप व्यवस्थित घालण्याची सूचना करुनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या कामाला विलंब होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.