वार्ताहर/ संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथे सापडलेले 162 जिवंत गावठी बॉम्ब न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी नष्ट केले आहेत. हे गावठी बॉम्ब डुकर व रानटी प्राणी मारण्यासाठी वापरण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. दरम्यान हे गावठी बॉम्ब बनविणाऱयाला आणि त्याला मदत करणाऱया स्थानिक ग्रामस्थाला संगमेश्वर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही सोमवार 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी आबस उर्फ कल्लू कथालाल बहेलिया (रा. मध्यप्रदेश) आणि सागर संजय कांबळे (24) या दोघांना अटक करण्यात आली होती. जिल्हा दहशतवादविरोधी पथक व बॉम्बनाशक पथकाला संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथे गावठी बॉम्ब घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली होती. गुरुवारी दहशतवादविरोधी पथकाने तातडीने या भागात सापळा रचला होता. धामापूर गावच्या हद्दीत जंगल परिसरात असणाऱया एका बंद शेतघराशेजारी संशयित व्यक्ती आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पथकातील कर्मचाऱयांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये ही व्यक्ती मध्यप्रदेशातील राहणारी असून त्याने आपले नाव आबस उर्फ कल्लू कथालाल बहेलिया असल्याचे सांगितले. त्याच्याकडे असणाऱया बॉक्समध्ये बॉम्बसदृश वस्तू दिसल्या. त्यामुळे तातडीने श्वान व बॉम्बशोधक पथकाला या पथकाने पाचारण केले.
हे पथक धामापूरला पोहोचले. याचदरम्यान, दहशतवादविरोधी पथकाने याची माहिती वरिष्ठ अधिकारी व संगमेश्वर पोलीस स्थानकाला दिली. बॉम्बशोधक पथकाने बॉक्समधील वस्तू या स्फोटक असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कल्लू बहेलिया याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. हे जिवंत गावठी बॉम्ब डुकर व रानटी प्राणी मारण्यासाठी वापरण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु यामुळे मानवी जीवितासही धोका निर्माण झाला होता. मानवी वस्तीत याचा स्फोट झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थ सागर संजय कांबळे (24) याला पोलिसांनी अटक केली आहे. सागर हा स्थानिक असून तो आबस उर्फ कल्लू कथालाल बहेलिया याला मदत करत होता, असे पोलीस तपासात आढळले आहे. संगमेश्वर पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना सोमवार 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार सापडलेले 162 गावठी बॉम्ब पोलिसांनी नष्ट केले आहेत.