शिकारीसाठीचे जिलेटिन बॉम्ब ट्रक्टरखाली सापडून भीषण स्फोट : एक ठार; खानापूर तालुक्मयातील माचीगडजवळ दुर्घटना
जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे जिलेटिन बॉम्ब दुचाकीवरून घेऊन जात असताना वाहनावरील ताबा सुटून समोरून येणाऱया ट्रक्टरच्या चाकाखाली दुचाकीस्वाराकडील बॉम्बची पिशवी सापडल्याने झालेल्या भीषण स्फोटात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी खानापूर तालुक्यातील माचीगडजवळ घडली.
वार्ताहर / खानापूर

खानापूर तालुक्मयातील माचीगडजवळ झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसर हादरला. या अपघातात ट्रक्टरचालक व दुचाकीचालक बालबाल बचावले तर मॉर्निंग वॉकसाठी गेलेली महिला जखमी झाली. अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव गिरीश धर्मानंद राजपूत (वय 17, रा. हक्कीपक्की, जिल्हा शिमोगा) असे आहे. त्याचे कुटुंबीय बिडी येथे वास्तव्य करून आहेत.
याबाबत हकीकत अशी की, शिमोगा भागातील काही भटक्मया जमातीतील लोक खानापूर तालुक्मयात फिरून व्यवसाय करत जंगलातील प्राण्यांची शिकारही करतात. शिकारीसाठी जिलेटिन बॉम्ब (सुतळी बॉम्ब) तयार करून ते रात्रीच्या वेळी जंगली डुक्कर आदी प्राण्यांची शिकार करून कुटुंबाची उपजीविका करतात. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हलसाल भागातील जंगलात शिकार आटोपून बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शिल्लक 50 हून अधिक सुतळी बॉम्ब पिशवीतून घेऊन धर्मानंद दुचाकीवरून बिडीकडे जात होते. दरम्यान, नंदगड येथील अभिजीत बेळगावकर हा युवक ट्रक्टर घेऊन शेतीकामासाठी जात होता. सुसाट येणाऱया दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकी घसरली. यावेळी सुतळी बॉम्ब असलेली पिशवी घेऊन बसलेला धर्मेंद्र ट्रक्टरखाली सापडला. त्यामुळे भीषण स्फोटाबरोबर ट्रक्टरच्या मोठा टायर फुटला. टायरमधील हवेच्या दाबामुळे दुचाकीवरील युवक जवळपास तीनशे फूट अंतरावर फेकला गेला. त्याच्या शरीराचे तुकडे झाले. धड एकीकडे तर मुंडके दुसरीकडे तर हाताचे तुकडे इतरत्र विखुरले होते. मात्र, या घटनेत दुचाकी चालक शिवकुमार गजेंद राजपूत (वय 28, रा. शिमोगा) याला किरकोळ दुखापत झाली. ट्रक्टरचा टायर उडाल्याने ट्रक्टर चालकाचेही नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक्टर हवेत उडून रस्त्याकडेला गटारीत कलंडला. ट्रक्टरचा चालक अभिजीत अर्जुन बेळगावकर हा या स्फोटातून सुदैवाने बचावला आहे. यादरम्यान माचीगड येथील रत्नाबाई जाधव नामक महिला मॉर्निंग वॉकसाठी गेली होती.
तिच्यासमोरच घडलेल्या या अपघातामुळे तिला चांगलाच धक्का बसला आहे.
आवाजाचा मोठा स्फोट होताच माचीगड गावातील जनतेने एकच गर्दी केली. घटनास्थळावरील विदारक चित्र व मृतदेहाचा झालेला चेंदामेंदा पाहून लोक हादरले. नंदगड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, उपनिरीक्षक उस्मान आवटी, हवालदार उगारेंसह पोलीस कर्मचाऱयांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला व पंचनामा करण्यात आला.
हा अपघात माचीगड गावापासून पाचशे फूट अंतरावर घडला आहे. अपघात झाला त्यावेळी आजुबाजूला कोणीही नव्हते. टायर व बॉम्ब फुटल्याने क्षणार्धात त्या ठिकाणी काय घडले, हे कोणालाच कळले नाही. बघता बघता टायरमधील धूर व रक्ताच्या चिळकांडय़ा आकाशात उडाल्या. काहीकाळ दोन्ही कान बधिर झाले. स्फोट होताच ट्रक्टर हवेत उडाला व रस्त्याच्या कडेला कलंडला, असे ट्रक्टर चालक अभिजीत बेळगावकर याने सांगितले.
पोटासाठी हे करावेच लागते…
शिमोगा भागातील भटक्मया जमातीतील काही लोक खानापूर तालुक्मयाच्या विविध भागात फिरून व्यवसाय करून उपजीविका करतात. रात्रीच्या वेळी जंगलात प्राण्यांची शिकार करून उपजीविका भागवतात. यासाठी फटाक्याची दारू एकत्र करून सुतळी बॉम्ब तयार करण्याची कला त्यांना अवगत आहे, अशी कबुली जखमी शिवकुमार राजपूत याने ‘तरुण भारत’ला दिली. या घटनेबाबत त्याला विचारले असता गेल्या पंधरा वर्षांपासून आमची काही कुटुंबे खानापूर तालुक्मयात वास्तव्यास आहेत. बिडी येथे एका भाडोत्री घरात आपले कुटुंब राहते. रोज रात्री जंगलातील डुकरांची व इतर प्राण्यांची शिकार करण्यासाठी आमची भटकंती असते. रात्रभर बॉम्ब ठेवून शिकार करतो. शिकार झाली नाही तर नागरिकांना धोका पोहोचू नये म्हणून सकाळी ते बॉम्ब गोळा करतो. शिकार करताना आम्हाला पोलीस व वनखात्याने तंबी दिली आहे. पण पोटासाठी हे करावेच लागते, असे त्याने सांगितले.
भीषण दुर्घटना…
- शिकारी दुचाकीस्वाराच्या पिशवीत 50 हून अधिक बॉम्ब
- दुचाकीवरील युवकाचा चेंदामेंदा
- ट्रक्टरचा टायर फुटल्याने तीनशे फूट अंतरावर मृतदेहाचे तुकडे
- ट्रक्टर-दुचाकी चालक बालबाल बचावले
- बॉम्बस्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला