प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या काळात तब्बल दहा महिन्यांनी शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. दहावीचे वर्ग आणि विद्यागमच्या माध्यमातून 6 वी ते 9 वीचे वर्ग सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या द़ृष्टीने शिक्षकांची कोविड चाचणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागातर्फे करण्यात आल्या असून त्यानुसार सोमवारपासून क्लस्टर निहाय प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सोयीच्या ठिकाणी शिक्षकांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. शाळानिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले असून शिक्षक कोविड तपासणीसाठी सकाळपासून केंद्रांवर उपस्थित राहत आहेत.
नवीन वर्षाच्या आगमनापासून शाळांचे शैक्षणिक वर्ष देखील सुरू होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांशी संपर्क येणाऱया शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळांशी संबंधित बसचालक यांची देखील कोरोना तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. यामुळे चार दिवसांच्या कालावधीत जिल्हय़ातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक कोरोना तपासणीला सामोरे जाणार आहेत. त्यानुसार बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात साधारण 10 हजारहून अधिक शिक्षकांची कोविड चाचणी करण्यात येणार आहे.
बेळगाव शहरात एकूण 14 ठिकाणी शिक्षकांच्या कोविड तपासणीसाठीची व्यवस्था करण्यात आली असून 2 हजार 659 शिक्षक कोविड चाचणीला सामोरे जाणार आहेत. दहा महिन्यांनंतर शाळा सुरू होत असताना शाळांचे निर्जंतुकीकरण, पालकांचे संमतीपत्र व पाल्याला आरोग्याचा कोणता त्रास नसल्याचे पत्र याबाबींकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले आहे. शिवाय विद्यार्थ्यांचा सर्वाधिक संपर्क शिक्षकांशी येणार असल्याने शिक्षकांची तपासणी करूनच शाळांचा प्रारंभोत्सव होणार आहे. कोविड चाचणी अहवाल शिक्षकांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. याबाबतचा अहवाल सीआरपीअंतर्गत संबंधित गटशिक्षणाधिकाऱयांना द्यावा लागणार आहे.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
कोविड तपासणीला सामोरे जाताना शिक्षकांनी देखील सामाजिक अंतराचे भान बाळगणे गरजेचे आहे. मास्कचा वापर व सामाजिक अंतर ठेवूनच तपासणी करून घेतल्यास धोका टळणार आहे. गट करून संवाद साधणे शिवाय नियमांकडे दुर्लक्ष करणे याबाबी धोका वाढवू शकतात. यामुळे कोरोनाचा धोका ओळखून शिस्तीत कोविड चाचणी करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.