अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा : खानापूर युवा समितीची शिक्षणाधिकाऱयांकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव व खानापूर तालुक्मयांमधील बऱयाच मराठी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे अतिथी शिक्षकांवर शाळा चालवाव्या लागत आहेत. राज्य सरकारकडून शिक्षक भरती केली जाणार असल्याने यामध्ये बेळगाव व खानापूर तालुक्मयातील शाळांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी खानापूर तालुका म. ए. युवा समितीच्यावतीने सोमवारी शिक्षणाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात
आली.
बेळगाव व चिकोडी या दोन शैक्षणिक जिल्हय़ांमध्ये जागा भरून घेतल्या जाणार आहेत. खानापूर तालुक्मयात अनेक दुर्गम भाग असून अनेक शाळांना शिक्षक नाहीत. विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या अनेक शाळा अतिथी शिक्षकांवर अवलंबून आहेत. या शाळांना कायमस्वरुपी शिक्षक मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले जाणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमाला प्राधान्य देत सर्व जागा भरून घ्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात
आली.
बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात 3 हजारहून अधिक जागा रिक्त आहेत. या जागा भरून घेताना मराठीला प्राधान्य न दिल्यास म. ए. युवा समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांना निवेदन सादर केले. मराठी माध्यमातील रिक्त जागा भरण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱयांनी दिले.
यावेळी म. ए. युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, आंबेवाडी ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील, नारायण सरदेसाई, राजू पाटील, बळीराम पाटील, विनायक सावंत, गोपाळ देसाई, सुरेश देसाई, राजाराम देसाई, महेश धामणेकर, कांतेश चलवेटकर यासह इतर उपस्थित होते.