शिरढोन/प्रतिनिधी
शिरढोण ता.शिरोळ येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्या मंदिर शाळेच्या छतावरील वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडाले होते, या शाळेच्या दुरुस्तीकरिता जिल्हा परिषदेकडून तांत्रिक मान्यता मिळाली पण सदरचे काम निविदा प्रक्रियांमध्ये अडकल्याने दुरुस्तीच्या कामाला विलंब लागत आहे. त्यामुळे शासनाकडून शाळा सुरू करण्याचा आदेशाला तर विद्यार्थ्यांची आणि महापुर आला तर लोकांचे राहण्याची गैरसोय होण्याची शक्यता असल्याने शाळा दुरुस्तीचे काम त्वरित व्हावे अशी माफक अपेक्षा नागरिकांसह पालक वर्गातून व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेच्या कुमार विद्या मंदिर शिरढोण या शाळेचे वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. शाळेच्या छतावरील पत्रे अँगल सह उडाल्याने खोल्या वरील छप्पर पूर्णपणे उघडे पडले आहे. सध्या पावसाळ्यात हंगाम असल्याने पावसाचे पाणी भिंतीवर व शाळेच्या खोलीमध्ये पडत असल्याने शाळेच्या खोल्यांना धोका निर्माण झाला आहे. या शाळेच्या दुरूस्ती कामाकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दहा लाख रुपयांचा निधी तांत्रिक स्वरूपात मंजूर झाला आहे.
मात्र तांत्रिक स्वरूपात मंजूर झालेल्या निधीला गेल्या महिनाभरापासून दुरुस्ती कामाची निविदा प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर थांबल्याने कामाला विलंब होत आहे. यदाकदाचित शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात आदेश काढला तर शाळा कुठे भरवायची हा प्रश्न पालकांसह शिक्षकांना पडला आहे.
ही निविदा प्रक्रिया लवकर होण्याबाबत जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, गटशिक्षणाधिकारी, सरपंच तसेच शालेय व्यवस्थापक समिती यांनी याबाबत लक्ष घालून शाळा दुरुस्तीचे काम त्वरित चालू करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.