शिरोळ / प्रतिनिधी
भरधाव कंटेनरने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार ठार झाला. चनाप्पा लक्ष्मण शिवशरण (वय २८, रा. कागनारी, ता. जत, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे. याबाबतची नोंद शिरोळ पोलिसांत झाली आहे. सुभाष अत्तरचंद कुमार (रा. दमदमा राजस्थान) या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार 12 रोजी अपघात एक ठार झाला होता अपघाताची मालिका सुरू झाली असून संबंधित विभागाने गतिरोधक व ठीक ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नेमण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी लक्ष घालून उपाययोजना करण्याचे आदेश देणे आवश्यक आहे.
शनिवारी सायंकाळी पावणेचार वाजण्याच्या सुमारास शिरोळमधील बुवाफन मंदिरासमोर कंटेनर हा भरधाव निघाला होता. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटरसायकलला कंटेनरने धडक दिल्याने शिवशरण हा कंटेनरच्या चाकाखाली येवून जागीच ठार झाला. याबाबतची तक्रार विनायक पाटील (रा. दत्तनगर शिरोळ) यांनी पोलिसांत दिली अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ज्ञानेश्वर सानप हे करीत आहेत.
अखेर बळी घेतला
चार दिवसांपूर्वी दैनिक तरुण भारतने बळी गेल्यानंतरच बांधकाम खाते डोळे उघडणार का हे वृत्त प्रसिद्ध केले होते. या ठिकाणी जर स्पीड बेकर असते तर आज अपघात घडला नसता एखाद्याचा बळी गेला नसता अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
शिरूर शहरात नऊ ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हावेत म्हणून वारंवार लेखी मागणी करूनही अद्याप संबंधित विभाग लक्ष दिले नाही पोलिसांनी तसा प्रस्तावही बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही याच ठिकाणी ग्रामदैवत बुवाफन महाराज मंदिर, पद्माराजे विद्यालय, शासकीय विश्रामगृह असून सततची वर्दळ आहे. आता तरी जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून दत्त कारखाना ते जनता हायस्कूल पर्यंत नऊ ठिकाणी स्पीडब्रेकर बसविण्याची मागणी होत आहे.