ऑनलाईन टीम / पुणे :
शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सालाबाद प्रमाणे शिवजयंतीला बुधवार, दि. १९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९ वाजता लालमहाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मिरवणुकीचे यंदा ८ वे वर्ष आहे. सरसेनापती, सरदार, सुभेदार, स्वराज्यसेनानी, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल ८५ स्वराज्यरथांचा सहभाग हे या सोहळ्याचे वैशिष्टय असणार आहे, अशी माहिती समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली. सोहळ्याचे उद्घाटन सुप्रसिध्द संगीतकार अजय अतुल, महापौर मुरलीधर मोहोळ, फते शिकस्त टीमचे दिग्पाल लांजेकर, अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, आमदार दिलीप मोहिते, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, संग्राम थोपटे, संजय जगताप, भीमराव तापकीर तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते होणार आहे. भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणा-या ५१ रणरागिनींचे औरंगासुर मर्दिनी भद्रकाली रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दिनी युद्धकला सादर करणार आहेत. शिवगर्जना ढोलताशा पथक, ५१ रणशिंग, ओम नमो: परिवर्तन महिला लेझीम पथक सहभागी होणार आहे.सोहळ्यामध्ये वीर येसाजी कामठे यांच्या पुतळ्याचे तसेच प्रतापगड युध्दवीर कृष्णाजी उर्फ रणबंकी गायकवाड यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्यावर सकाळी ११ ते १२ या वेळेत ईशान अमित गायकवाड यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.