सिंधुदुर्ग/प्रतिनिधी
दोनच दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. शिवसेना भवनासमोर आंदोलन करणाऱ्या भाजपयुवामोर्चाच्या कार्यकर्त्यांना शिवसेना कार्यकर्ते भिडले. यावेळी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. तशाच स्टाईलचा राडा आज कोकणात सिंधुदुर्गमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला. दरम्यान सिंधुदुर्गमध्ये आज एका पेट्रोलपंपावर शिवसेना आणि राणेसमर्थक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी एका पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल वाटायला सुरुवात केली. शहरात भाजपला पेट्रोल दरवाढीवरून खिजवण्यासाठी हा प्रकार केल्याचं बोललं जात होतं. भाजपच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर राणेसमर्थक भाजपा कार्यकर्ते तिथे पोहोचले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी आमदार वैभव नाईक देखील यावेळी उपस्थिती होते . पण तेवढ्यात पोलिसांनी मध्ये पडत हा प्रकार थांबवला. यवादानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट शिवसेना खासदार संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. “शिवप्रसाद काय अतो, हे संजय राऊतांनी वैभव नाईकांना विचारावं, पोटभर दिलाय आज”, असं नितेश राणे म्हणाले आहेत. शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावर संजय राऊतांनी केलेल्या शिवप्रसाद आणि शिवभोजन थाळीचा संदर्भ घेऊन केलेल्या विधानावर नितेश राणेंनी हा टोला लगावला आहे.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी या मुद्द्यावरून संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. “शिवप्रसाद काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईकांना विचारावं. पोटभर दिलाय आज आमच्या कार्यकर्त्यांनी. पाहिजे असेल, तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिसमध्ये. टेस्ट आवडेल नक्की!” असं ट्वीट करत नितेश राणेंनी संजय राऊतांना देखील या ट्वीटमध्ये टॅग केलं आहे.