प्रतिनिधी / पिंपळनेर
गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर, अहमदाबाद येथे सुरू असलेल्या ८ व्या वेस्ट झोन शॉटगन शुटिंग चॅम्पियनशिप २०२१ या स्पर्धेत निमगाव टें ता.माढा गावचे सरपंच, विठ्ठल कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक व आमदार संजयमामा शिंदे यांचे सुपुत्र यशवंत संजयमामा शिंदे यांनी सुवर्णपदक पटकावले.
७ मार्चपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा या राज्यातील तसेच दमण व दीव आणि दादरा- नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील स्पर्धक सहभागी झालेले आहेत. प्रशिक्षक सिद्धार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत शिंदे यांनी सहभाग घेतला होता.
यशवंत शिंदे यांनी डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये एकूण ५० गुण प्राप्त करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल यशवंत शिंदे यांचे आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, उद्योजक रमेश शिंदे, जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे, पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे यांनी अभिनंदन केले.यशवंत शिंदे यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्य़ातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.