प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे सकाळी 11 ते दूपारी 2 वाजेपर्यंत एकच कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे राज्यभर थेट प्रक्षेपण झाले. कोल्हापूरातून मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक सभागृहात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिह्यातील नेते आणि कार्यकर्ते थेट प्रक्षेपण सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य प्रमुख नेते आणि पदाधिकाऱयांनी शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यांच्या 55 वर्षाच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकून जीवनचरित्रास उजाळा दिला.
थेट प्रक्षेपण कार्यक्रमापूर्वी शाहू सांस्कृतिक सभागृहामध्ये सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, शहराध्यक्ष आर.के.पोवार, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, नाविद मुश्रीफ, राजेश लाटकर आदींच्या उपस्थितीत भव्य केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर मुंबई येथे थेट प्रक्षेपणाद्वारे सुरु झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्वजण सहभागी झाले. सुरुवातीस शरद पवार यांच्या सामाजिक, राजकीय प्रवासाची चित्रफीत दाखवण्यात आली. यासाठी सभागृहात मोठे स्क्रिन लावले होते.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहमंत्री अनिल देशमुख, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जेष्ठ नेते एकनाथ खडसे, अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोगत व्यक्त करून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत काम करताना आलेले अनेक अनुभव मांडून जीवनचरित्रास उजाळा दिला. प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी आभार मानले.
शरद पवार यांनी वाढदिनी सांगितली `त्रिसुत्री'
मुंबई येथून थेट प्रक्षेपणाद्वारे सुरु असलेल्या शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये राज्यातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांची भाषणे झाल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या भाषणातून कोणतीही राजकीय टिकाटिप्पणी न करता पक्षसंघटना मजबूत करण्याचा संदेश दिला. पक्ष बळकट करायचा असेल तर जनतेची कामे करा, युवकांचे प्रबळ संघटन करा, पक्षाच्या 27 सेलच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना न्याय द्या, ही त्रिसुत्री पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितली. करून राज्य आणि देशाची कणखरपणे सेवा करतील असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.