ऑनलाईन टीम / श्रीनगर :
श्रीनगरमधील झाकुरा भागात पोलीस आणि दहशतवांद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमधील एक दहशतवादी लष्कर-ए-तोयबा आणि दुसरा रेजिजटेंस फ्रंटचा सदस्य असल्याचे सांगण्यात येते. या दहशतवाद्यांकडून 2 पिस्तुलांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आयजीपी काश्मीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील झाकुरा भागात दहशतवादी लपल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती. या माहितीवरुन श्रीनगर पोलिसांनी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरु केली. श्रीनगर पोलीस दहशतवाद्यांच्या लपण्याच्या दिशेने जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तर दिल्याने दोघांमध्ये चकमक सुरु झाली. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. ठार केलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव इखलाक हजम असे आहे. हसनपोरा अनंतनाग येथील अली मोहम्मद यांच्या हत्येत त्याचा हात होता.