पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस : केंद्राचे राज्य सरकारला सर्व सहकार्य
प्रतिनिधी / पणजी
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे सध्या मणिपाल इस्पितळात कोविडवर उपचार घेत असून त्यांना काल सोमवारी प्लाज्मा थेरपी देण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सोमवारी बिघडल्याने त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी फोनवरुन नाईक यांच्याशी चर्चा केली. नाईक यांची काळजी घेण्यासाठी दिल्लीहून तज्ञ डॉक्टरांचे पथक गोव्यात पोहोचले आहे.
केंद्र सरकार गोवा सरकारच्या सातत्याने संपर्कात असून श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीची खबर घेतली जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी श्रीपाद नाईक यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधलेला आहे. आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत देण्यात येत आहे.
पंतप्रधानांनी केली विचारपूस
श्रीपादभाऊंच्या बिघडत्या परिस्थितीची माहिती पंतप्रधानांना पोहोचल्यानंतर सोमवारी दुपारी पंतप्रधानांनी श्रीपादभाऊंच्या पत्नी विजया यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते श्रीपाद भाऊंबरोबर बोलले. केंद्र सरकार नाईक यांच्याबरोबर असल्याचे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले.
दि. 14 ऑगस्ट रोजी तपासणीनंतर इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या नाईक यांची प्रकृती रविवारी बिघडली आणि त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली असता त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांपर्यंत कोरोनाची बाधा पोहोचली असल्याचे दिसून आले.
वास्कोवासियांनी दान केला प्लाज्मा
सोमवारी त्यांच्यावर प्लाज्मा थेरपीचा प्रयोग करण्याचा विचार झाला. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने अधिकाऱयांची वैद्यकीय पथकांबरोबर बैठक घेतली. तोपर्यंत नाईक यांना कृत्रिम श्वासोश्वास देण्यात आला. वास्कोतून तीन माजी नगरसेवक व इतरांनी श्रीपादसाठी रक्तदान करण्याचे ठरविले. त्यांचे रक्त घेऊन त्यातून प्लाज्मा काढून तो दुपारी 2 च्या दरम्यान त्यांना देण्यात आला. आज मंगळवारी पुन्हा सायंकाळी त्यांना प्लाज्मा थेरपी देण्यात येईल.
पत्रकारांकडे बोलताना श्रीपादना गहीवरून आले. काल मंगळवारी सायंकाळी त्यांची प्रकृती स्थिरावली असून तमाम भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या हजारो चाहत्यांनी देवाकडे साकडे घालण्यास प्रारंभ केला आहे.
दिल्लीहून डॉक्टरांचे पथक दाखल
दरम्यान, श्रीपादभाऊंवर उपचार करण्यासाठी त्रिसदस्यीय डॉक्टरांचे विशेष पथक दिल्लीहून गोव्यात पोहोचले असून आज सकाळी त्यांची तपासणी करणार आहेत. सायंकाळी एम्सचे विशेष पथक श्रीपाद भाऊंवर उपचार करतील.