क्षेत्ररक्षण करताना दुखापत, आयपीएलच्या पहिल्या टप्प्यालाही मुकण्याची शक्यता
पुणे / वृत्तसंस्था
भारताचा आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतून बाहेर फेकला गेला असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. यापूर्वी, पहिल्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आणि त्यावेळी तो कळवळून मैदानावर कोसळला होता. पहिल्या वनडेत या मुंबईकर फलंदाजाला केवळ 6 धावांवर बाद व्हावे लागले होते.
श्रेयस इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेल्या वनडे मालिकेतून बाहेर फेकला गेला आहे. शिवाय, आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात तो खेळण्याची शक्यताही कमीच असेल, असे भारतीय क्रिकेट मंडळातील एका सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टोने ड्राईव्ह लगावल्यानंतर चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात श्रेयसला ही दुखापत झाली.
श्रेयस आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खेळू शकला नाही तर त्याची प्रँचायझी दिल्ली कॅपिटल्ससाठी ही चिंतेची बाब ठरु शकते. आयपीएल स्पर्धेत श्रेयस दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करतो. आयपीएलच्या मागील आवृत्तीत श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. सध्या झालेल्या खांद्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान 6 आठवडय़ांचा कालावधी लागेल आणि शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागल्यास हा कालावधी आणखी वाढेल, असे सध्याचे चित्र आहे.
आयपीएल स्पर्धेत जिथवर श्रेयस खेळू शकणार नाही, तिथवर नेतृत्वाची धुरा रिषभ पंत, ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथ किंवा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनकडे सोपवली जाऊ शकते.
दुखापतग्रस्त मॉर्गन, बिलिंग्जच्या उपलब्धतेबाबत साशंकता
पुणे ः इंग्लिश कर्णधार इयॉन मॉर्गन व सॅम बिलिंग्ज उद्या (शुक्रवार दि. 25) होणाऱया दुसऱया वनडे सामन्यात खेळू शकतील का, याबाबत सध्या साशंकता आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्या लढतीत दुखापतग्रस्त झाले आहेत. भारताने या 3 सामन्यांच्या मालिकेत 66 धावांनी विजय संपादन करत 1-0 अशी आघाडी घेतली असून यामुळे पाहुण्या इंग्लिश संघावर दुसऱया लढतीत दडपण असणार आहे.
मॉर्गनला उजव्या हाताचा अंगठा व तर्जनी यामध्ये दुखापत झाल्याने 4 टाके घालून घ्यावे लागले तर बिलिंग्जला चौकार अडवण्याच्या प्रयत्नात कॉलरबोनच्या दुखापतीचा सामना करावा लागला. मॉर्गनने पुढील 48 तासानंतर काय चित्र असेल, त्यावर निर्णय घेतला जाईल, असे नमूद केले.
भारताने 318 धावांचे आव्हान दिल्यानंतर इंग्लंडचा डाव 251 धावात आटोपला आणि त्यात मॉर्गनचा वाटा अवघ्या 22 धावांचा होता. 2019 ची वर्ल्डकप खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या बिलिंग्जला देखील 18 धावांवरच समाधान मानावे लागले. मॉर्गन, बिलिंग्ज दुसऱया वनडेत उपलब्ध होऊ शकले नाहीत तर मॅट पार्किन्सन, रीस टॉपली, पदार्पणवीर लियाम लिव्हिंगस्टोन यांना संधी मिळू शकते.