पुरुषप्रधान संस्कृती, कौटुंबिक हिंसाचारामुळे आज असंख्य महिला त्रस्त आहेत. तुळजापूरमधला महिलांचा एक गट या सगळ्याला विरोध करत बदल घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. एकेकाळी कौटुंबिक हिंसाचार सोसलेली लक्ष्मी वाघमारे ही महिला महिलांच्या हक्कांसाठी लढत आहे. लक्ष्मी 17 हजार महिलांची प्रतिनिधी आहे. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी लक्ष्मीचं लग्न तिच्या मामाशी लावून देण्यात आलं. लक्ष्मी नववीत असताना तिचं शिक्षण थांबवण्यात आलं. पण तिला शिकायचं होतं. स्वतःला सिद्ध करायचं होतं. मग लक्ष्मीने अन्नपाण्याचा त्याग केला. शाळेत पाठवलं नाही तर आत्महत्या करेन, अशी धमकीही दिली. अखेर लक्ष्मीला शाळेत पाठण्यात आलं. तिने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं. तीन मुलांची आई असणार्या लक्ष्मीला बारावीनंतर शिक्षण घेता आलं नाही. मात्र कालांतराने काम करण्याची संधी मात्र चालून आली. 2000 मध्ये हेलो मेडिकल फाउंडेशन(एचएमएफ) ही संस्था त्यांच्या गावात आली. गावातल्या आजारी लोकांच सर्वेक्षण करून याबाबतची माहिती संस्थेला देण्यासाठी ग्रामपंचायतीला एका कार्यकर्त्याची आवश्यकता होती. यासाठी बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या लक्ष्मीची निवड करण्यात आली आणि तिला आरोग्य कर्मचारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या कामाचे दर महिन्याला 300 रुपये मिळत होते. लक्ष्मीने आपल्या कामाचा आवाका वाढवला. ती आजूबाजूच्या गावांमध्येही जाऊ लागली. या कामादरम्यान तिला काही टोमणेही ऐकावे लागले. मात्र तिचं काम बघून गावकरीही सहकार्य करू लागले. सर्वेक्षणाचं काम करत असताना महिलांच्या अनेक समस्याही तिच्यासमोर येऊ लागल्या. मग तिने 10-12 महिलांना सोबत घेऊन स्वयंसहाय्यता गट स्थापन केला. या सगळ्या महिला एकाकी आयुष्य जगत होत्या. त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. मग आर्थिक सहाय्य करण्यासाठी प्रत्येकीकडून 100 रुपये घ्यायचं ठरलं. 2010 मध्ये एचएमएफने लक्ष्मीला कोरो इंडियातर्फे राबवण्यात येणार्या
फेलोशीप कार्यक्रमासाठी नामांकित केलं. इथे तिने एकल महिला संघटनेची बीजं रोवली. ग्रामीण भागातल्या एकटय़ा महिलांना यामुळे मोठाच आधार मिळाला. साधारण दोन दशकांमध्ये लक्ष्मीने चार जिल्ह्यांमधल्या 300 गावातल्या महिला मंडळांच्या 190 महिलांना नेतृत्वविषयक प्रशिक्षण दिलं आहे. लक्ष्मीने जवळपास 17 हजार महिलांच्या आयुष्यात बदल घडवला असून त्यांना गरिबी आणि कौटुंबिक हिंसाचारातन मुक्त केलं आहे. लक्ष्मीने चार मुलींचे बालविवाह रोखले आहेत. मुलींना शिक्षित करणं किती आवश्यक आहे हे तिने लोकांच्या मनावर ठसवलं आहे. प्रत्येक महिलेने स्वतःचं भविष्य घडवायला हवं, स्वावलंबी व्हायला हवं. तसंच स्वतःच्या हक्कांसाठी लढायला हवं, असा संदेश ती देते.
Previous Article‘गंगावरम पोर्ट’मधील अदानी हिस्सेदारी घेण्याचे संकेत
Next Article नक्षलवाद्यांकडून स्फोट, 4 जवान हुतात्मा
Related Posts
Add A Comment