हातकणंगले / प्रतिनिधी
देशात व राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने हाहाकार माजल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यात संचारबंदी व लॉकडाऊनचे आदेश दिले असताना नरंदे (ता.हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी ऊसतोडणी हंगाम पूर्ण झाल्यामुळे गावाकडे जाण्यास परवानगी देवून संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाचे उपसंचालक (साखर) एस. एन. जाधव यांनी फिर्याद दिली.
दरम्यान राज्याच्या आरोग्य राज्यमंत्र्यांच्या साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी,कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक वस्तुंची वाहतूक वगळता अन्य कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी साखर कारखान्याच्या लेटर पँडवर मजूर रामकिसन भगवान वायनसे (रा. नामेवारी ता.केज जि.बीड) हे कारखान्याकडील गळीत हंगाम २०१९-२०२० ऊस तोडणी वाहतूक पूर्ण झाल्याने गावी जात आहेत. त्यांना गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली असून त्यांना जाण्यासाठी अडथळा करु नये, सोडण्यात यावे. अशा आशयाचे पत्र देवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले.
यामुळे कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांच्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १४४(१) (३) प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने भा. दं. वि. सं. क. १८८ ,२६९, २७०,२९१ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब) प्रमाणे गुन्हा केल्याने हातकणंगले पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक भंवड करीत आहेत.
Previous Articleएएफसीच्या कोरोना मोहिमेत बाला देवीचा समावेश
Next Article चित्रकूटचा नितांतसुंदर परिसर
Related Posts
Add A Comment